उत्तर भारतीय मुंबईची शान!

0

मुंबई । मनसेची उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका आणि फेरीवाला हटाव मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहेत. ते मेहनतीने मुंबईच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भाषा आणि प्रांताच्या नावावर देशाची विभागणी होता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. साकीनाका येथे साईश्रद्धा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय संमेलनात महाजन बोलत होत्या. येथे येणारा मुंबईचाच होऊन जातो. उत्तर-दक्षिण भारत हीच खरी संस्कृती आहे, असेही त्या म्हणाल्या. ’आम्ही उत्तर भारतीय प्रामाणिक आहोत. बंडखोर आहोत. कुणी आमच्या वाट्याला गेले तर त्यांना सोडत नाही.’ असे वक्तव्य मुंबई भाजपचे उपाध्यक्ष राजहंस सिंह यांनी केले. दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून सुरू असलेली ही मोर्चेबांधणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उत्तर भारतीय नागरिक मेहनती
मनसेकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पूनम महाजन म्हणाल्या, ’भाषा आणि प्रांताच्या नावावर देशाचे विभाजन होता कामा नये. उत्तर भारतीय नागरिक मेहनती आहेत. जर उत्तर भारतीयांनी मुंबईची स्वप्ने पाहिली नाहीत, तर 50 टक्के मुंबई अशीच बंद पडेल. त्यामुळे त्यांच्या शक्तीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उत्तर भारताने देशाला मोठमोठे नेते दिले आहेत, हे विसरता कामा नये’. याच उत्तर भारतात माझ्यासारख्या मराठी मुलीलाही भरपूर प्रेम मिळत आहे’, असे त्यांनी सांगितले.

’महाजन, भाजप मुंबईची घाण’
मराठी माणसांनी मुंबई वाढवण्याचे काम केले आहे. असे असताना स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी हे असं वक्तव्य भाजपा करत असेल तर भाजपा आणि पूनम महाजन मुंबईची घाण आहे. यांना मराठी माणूसच योग्य उत्तर देईल.
– संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस

मुंबईतील उत्तर भारतीयांची ताकद नाकारता येणार नाही. उत्तर भारतीयांनी देशाला अनेक बडे नेते आणि पंतप्रधान दिले आहेत. पंतप्रधान मोदीही वाराणसीतून निवडून आले आहेत. उत्तर भारतात दौर्‍यांवेळी माझ्यासारख्या मराठी मुलीला खूप सन्मान मिळाला.
– खासदार पूनम महाजन