आचारसंहिता कालावधीत 181 गुन्ह्यांंची नोंद
58 लाखाचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार : लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून आदर्श आचारसंहिता कालावधीत 181 गुन्ह्यांंची नोंद करण्यात आली आहे. 57 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत अवैध दारु विक्री व वाहतुकीच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देशित केले होते.
उत्पादन शुल्क विभागाकडे केवळ दोन निरीक्षक पथक मंजूर असताना मर्यादित मनुष्यबळाचा उपयोग करून प्रभावी कारवाई केली आहे. शेजारील राज्यात मर्यादीत कारवाई झाली असताना जिल्ह्यातील अधिकार्यांनी मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन संयुक्त उपाययोजना कार्यान्वित केल्या. आचारसंहिता काळात परवानाधारकांकडून दैनंदिन मद्यविक्रीची माहिती घेण्यात येत आहे. संशयास्पद विक्री किंवा वाढीव विक्रीकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. परवाना तपासणीच्या कार्यवाहीत वाढ करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत आतापर्यंत 117 आरोपींना अटक करण्यात आली असून 20 वाहने जप्त करण्यात आली आहे. दारुबंदी गुन्ह्याचे सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यांच्याविरुद्ध हमीपत्र घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात 27 एप्रिल ते 29 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरडा दिवस ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कालावधीत अधिक खबदारी म्हणून परवाना सिलबंद करण्यात येणार आहे.
मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी व अलिराजपूर जिल्ह्याच्या नंदुरबार सीमेलगत परिसरात परवाना बंद ठेवण्याबाबत तेथील जिल्हाधिकार्यांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील रासायनिक ताडी विक्रीबाबत प्राप्त तक्रारी संदर्भात कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.