नेरळ । लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्रित करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना राबविली. पुढे, वर्षोनुवर्षे उत्सवाचं स्वरूप बदलत गेले आणि हल्ली तर गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंटच झाल्याच आपणास दिसून येतं. परंतू, कोदिवले गावातील नव तरूणांसह समस्त ग्रामस्थांचा सहभाग असेलेलं माघी गणेशोत्सव मंडळ नेहमीच आगळेवेगळे कार्यक्रम राबवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न उत्सवाच्या माध्यमातून करत असतो. यंदाही असाच एक अनोखा विषय घेऊन अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश या दिला जाणार आहे. अवयव प्रत्योरापण कमिटी अर्थात झोनल ट्रान्सप्लांट काँर्डिनेशन कमिटी यांचेही सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. यावेळी साधारण 25 हून अधिक तरूण अवयवदानाची शपथ घेणार आहेत.
युवकांची भजन जुगलबंदी ठरणार आकर्षण
उत्सवादरम्यान अवयवदान संकल्पनेविषयी माहितीचित्रके, कायदेशीर बाबींची माहिती, कोणकोणत्या अवयवांचे मृत्युपश्चात दान करता येऊ शकेल या संदर्भात परिपूर्ण माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. अवयवदानाविषयी असणारे समज-गैरसमज, कोणते अवयव किती वेळात दान करायचे, त्यासंदर्भातील नियमावली आदी विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी झेडटीटीसी चे प्रतिनिधी 21 जाने रोजी सकाळी 11.वा येऊन मार्गदर्शन करणार आहेत. यासंदर्भात शाळेतील मुलांमध्ये जागृती करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये 3 ते 5वी, 6 ते 7 व 8 ते 10 या इयत्तेतील मुलं-मुली सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक निवडले जातील व त्यांना मंडळातर्फे पारितोषिक दिले जाणार आहे. याचबरोबर 21 ते 25 जानेवारी दरम्यान शाळेतील मुलांच्या कलांगुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महिलांसाठी हळदीकुंकू, युवकांच्या भजनाच्या जुगलबंदीचे आयोजनही करण्यात आले आहे.