उत्सव कसले साजरे करता?

0

मुंबई : देशाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सीमेवर जवान शहीद होत आहेत. शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. एव्हढी चिंताजनक परिस्थिती असताना सरकार उत्सव कसला उत्सव साजरा करते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला.

देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. खोटा प्रचार करून मोदींनी देशाच्या जनतेला फसवले आहे. तीन वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने मोदींनी पूर्ण केलेली नाहीत आणि दररोज नवनव्या घोषणा ते करत आहेत. तीन वर्षांत जाहिरातींवर १५०० कोटी रूपये खर्च करण्यात आले. सरकारी तिजोरीतून जाहिरातींवर कोट्यवधी रूपये उधळण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीला कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला.

मोदी सरकारच्या काळात देशाची अंतर्गत आणि सीमा सुरक्षाही धोक्यात आली आहे. सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत. भाजपा सरकारकडे परराष्ट्र निती नसून कूटनिती म्हणजे फोटो काढण्याची संधी नाही, हे पंतप्रधान मोदींना समजत नाही. कुठलेही निमंत्रण नसताना पंतप्रधान मोदी पाकिस्तानात का गेले? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बडबोले असून फक्त घोषणा करत राहतात. तीन वर्षांत सहा कोटी रोजगाराची निर्मिती करू असे आश्वासन मोदींनी दिले होते. पण प्रत्यक्षात दहा लाख रोजगाराची तरी निर्मिती झाली का? उलट नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. आमच्या काळात गुंतवणुकीचा दर ३४ टक्के होता. आता तो २६ टक्के झाला आहे, असे शर्मा म्हणाले.

विशेष अधिवेशन बोलवा – अशोक चव्हाण
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसचा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. संप दीर्घकाळ चालणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने तत्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून शेतकरी संपावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने अल्पभूधारक आणि बहुभूधारक असा भेद न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, असेही ते म्हणाले.