पुणे । सातार्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरुजींची जाहीरपणे पाठराखण केल्याने उदयनराजेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बारामतीमधील हेमचंद्र मोरे या वकीलांनी एक पत्रक काढून बारामती पोलिसांकडे ही मागणी केली आहे. उदयनराजेंनी या मुलाखतीमध्ये वारंवार जातीचा उल्लेख करुन दलितांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोरेगाव भीमाचे पडसाद सुरूच
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारानंतर भिडे गुरुजींवर आरोप सुरु झाले. त्यानंतर उदनयराजे त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. याशिवाय जितेंद्र आव्हाड यांनी बोलतांना विचार करावा असा सल्लाही उदयनराजे भोसलेंनी दिला. कोरेगाव भीमा दगडफेक प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरुजी दगडफेकीचे सूत्रधार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या घटनेमागे काही काही संघटना असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केला आहे. आता बारामतीमधून उदयनराजेंबद्दल अशी मागणी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.