अमळनेर-गांजा विक्री प्रकरणात अटक झालेल्याकडून पाच लाख प्रोट्रेक्शन मनी घेतल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. या प्रकरणात खोटे आरोप करून बदनामी केल्याची फिर्याद उदय वाघ यांनी अमळनेर पोलिसात दिली असून त्यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, भाजपचे कोषाध्यक्ष लालचंद हेमनदास सैनानी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
लालचंद सैनानी यांना पदावरून दूर केल्याने त्यांनी आरोपीशी संगनमत करून सैनानी यांनी ध्वनीफित तयार केली, यासह अनिल भाईदास पाटील यांनी सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये खोटे आरोप केले. या आरोपामुळे माझी बदनामी झाली. ध्वनीफितीतील व्यक्ती हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल आहे. असे असताना त्याचा गैरफायदा घेऊन माझी व पोलीस अधिकाऱ्यांसह पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी आरोपींनी संगनमत व कटकारस्थान करून जनतेत संभ्रम निर्माण व्हावा, म्हणून हे गंभीर स्वरूपाचे कृत्य केले आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होन सखोल तपास करावा, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
यावरून अमळनेर पोलिसात भाग 5 गुरन 124/208 आयपीसी 499,500,120 ब, 34 सह माहिती व तत्रज्ञान कायदा कलम 66(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.