उद्धव ठाकरे पवारांना भेटले; राज्य हादरले!

0

मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र डागत असतानाच, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वीच भेट घेऊन राजकीय खलबते केल्याची धक्कादायक माहिती चव्हाट्यावर आली आहे. या माहितीने सत्ताधारी भाजपचे चांगलेच धाबे दणाणले. ठाकरे-पवार भेटीतून राज्यात नवीन राजकीय समिकरणे निर्माण होतात, की शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करते याबाबत दिवसभर राज्यभरात जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच, सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, असे पवारांना स्पष्टपणे कळविले. त्यावर आधी तुमचा निर्णय तुम्ही घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असे पवारांनी ठाकरे यांना सांगितले. भाजपला दूर करून राज्यात सत्ता स्थापण्यास काहीच हरकत नाही, असेही पवारांनी ठाकरेंना स्पष्ट केले. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा ठाकरे यांनी करावयाची असून, त्यानंतरच पवार हे शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा करतील, असेही वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच या राजकीय घडामोडी होतील, असेही हे सूत्र म्हणाले.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित!
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ओळख निर्माण झालेल्या ‘मातोश्री’वर आतापर्यंत राजकीय पक्षांचे नेते ठाकरेंच्या भेटीसाठी जात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा मोडत मातोश्रीबाहेर विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, शिवसेना नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वीच राज्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज ठाकरे-पवार भेटीनंतर वर्तविला जात आहे. त्यातच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे शत्रू नारायण राणे यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळणे निश्चित आहे. त्यामुळे ठाकरे हे दुखावले गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रभावातून बाहेर पडून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या कट्टरविरोधक ममता बॅनर्जी यांची ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता शरद पवारांची भेट घेत भाजपला स्पष्ट संकेत दिले आहेत. सत्तेतून बाहेर पडण्याची मानसिकता बनली असून, त्याबाबत त्यांनी पवारांचा मार्गदर्शन घेतले, अशी माहिती पवारांच्या निकटवर्तीयांनी दिली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असा सत्तेचा फॉर्म्युला बनविता येईल का, अशी चाचपणीही यावेळी ठाकरे यांनी केली. तेव्हा पहिल्यांदा तुम्ही तुमचा निर्णय घ्या, नंतर आम्ही आमची भूमिका ठरवू, असे पवारांनी ठाकरे यांना यावेळी स्पष्टपणे सांगितले, असेही सूत्र म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीही भाजपमुळे त्रस्त
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकारणातील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप ही शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी गमावत नाही. अलिकडे भाजपही शिवसेनेला उघडपणे विरोध दर्शवत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची सहकारासारखी बलस्थाने उद्ध्वस्त करण्याचे डावपेच भाजप रचत आहे. घोटाळ्यांच्या कारवाईत नेत्यांना तुरूंगात डांबण्याच्या धमक्याही भाजपकडून दिल्या जात असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्षही मेटाकुटीला आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपविरोधात राज्यात सर्व विरोधक एकत्रही येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या भेटीत उद्धव ठाकरेंनी राज्यातील परिस्थितीबाबत शरद पवारांशी चर्चा केली. सरकारमधून बाहेर पडावे असे शिवसेनेला वाटत असून राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ठाकरे म्हणाले. आम्ही सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार? अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी पवारांना केली. 2014ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. पण काही दिवसांपूर्वीच आम्ही जाहीर केले की, जर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही. यावर आम्ही ठाम आहोत, असे पवारांनी या भेटीदरम्यान उद्धव यांना सांगितल्याचेही सूत्र म्हणाले.

शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपला पाठिंबा नाही : पवार
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात दहा दिवसांपूर्वी भेट झाल्याचे दस्तुरखुद्द शरद पवारांनीच कर्जत येथील पत्रकार परिषदेत मान्य केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोघांसोबत माझी भेट झाली. मात्र राजकीय समीकरणांबाबत उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत, असे पवार म्हणाले. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही, बाहेरूनही पाठिंबा देणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. मात्र सरकारचा पाठिंबा आम्ही काढू असे उद्धव ठाकरे बोललेले नाहीत, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना सरकारमध्ये समाधानी असल्याचे वाटत नाही, असे मत व्यक्त करत, आम्ही समविचारी पक्षासोबत राहू असे सांगत शरद पवारांनी गुगली टाकली. शिवसेनेला सोबत घेणार नाही असेच एकप्रकारे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

समविचारी पक्षाबरोबर जाणार
चिंतन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भेटायला आले होते. मात्र ते सत्तेत समाधानी असल्याचे जाणवत नाही. शिवाय, उद्या कुणी सत्तेतून पाठिंबा काढला, तरी कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचा पक्ष समविचारी पक्षाबरोबर जाणारी भूमिका कायम मांडत राहिला आहे. उद्धव ठाकरेंबरोबर राजकीय समीकरणांबाबत चर्चा झाली नाही.