उद्धव ठाकरे संभ्रमावस्थेत

0

उद्धव ठाकरे यांनी राज्यभर ‘शेतकरी संवाद’ दौरे सुरू केल्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्रीही चिंतित आहेत. या सरकारला पाठिंबा देण्यावरूनही शिवसेनेत दोन गट आहेत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय शिवसेना नेते सुभाष देसाई यांनाच मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यामार्फतच ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्कात असतात. जनमानसात फारसे स्थान नसलेले सुभाष देसाई हे गेल्या विधानसभा निवडणुकीत पडले. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेचा गोरेगावमध्ये सफाया झाला. दुसरे नेते दिवाकर रावते हेसुद्धा सरकारमध्ये राहण्याच्या पक्षातीतही आहेत. तिसरे मंत्री डॉ. दीपक सावंत यांना ते राहतात तिथले लोक ओळखत नाही.

परंतु, जनमानसात स्थान असलेल्या रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी दूर ठेवले आहे. कदम यांना मंत्री केले असले तरी या सरकारमध्ये राहिल्यास ङ्गशिवसेनेचा जनाधार कमी होईलफ, असे मत त्यांचे सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी या सरकारवर टीका करण्याची आणि मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची जबाबदारी रामदास कदम यांच्यावर सोपवली आहे. एकनाथ शिंदे यांचे जनमानसात स्थान असले तरी आपली कामे करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव परदेशी हे एकनाथ शिंदे यांचे खास आहेत. त्यामागची कारणे वेगळी आहेत. उद्धव ठाकरे यांनी नेत्यांच्या आणि शिवसैनिकांच्या दबावामुळे ‘शेतकरी संवाद’ दौरा सुरू केला असला तरी काही ठोस निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. शिवसैनिकांना हे सरकार आपले कधीच वाटले नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिकाचेही या सरकारमध्ये राहू नये, असे मत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या चाचपणीमध्येच पाच वर्षे जाणार, अशी शिवसैनिकांची भावना आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वाद पर्यावरण खात्याअंतर्गत येणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यावर सोपवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे. यापूर्वी अध्यक्ष हा अशासकीय सदस्य असे. परंतु, कोर्टाने अटी टाकल्यामुळे आयएएस अधिकार्‍याची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यापूर्वी सदस्य सचिव अण्बुगलम अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत असत. पण आता म्हैसकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार दिला गेल्याने दोन आयएएस अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार पाहणार आहेत. या महामंडळावर सदस्य म्हणून उद्धव ठाकरे यांचे साडू सतीश सरदेसाई यांचे नाव शिवसेनेने पाठवले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती जाहीर केलेली नाही. अध्यक्षपदाचा धुरा मिलिंद म्हैसकर यांच्याकडे आल्यामुळे रामदास कदम यांचे पंख छाटले, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु ही चर्चा तथ्यहीन आहे. रामदास कदम हे पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत. प्रदूषण महामंडळ हे पर्यावरण मंत्रालयाच्या अख्यत्यारित येते. त्यामुळे अर्थातच रामदास कदम यांच्या निर्देशानुसारच मंडळाचा कारभार चालणार आहे. फक्त फरक एवढाच आहे. यापूर्वी या मंडळाचा अध्यक्ष हा अशासकीय असे. परंतु हायकोर्टाने अटी टाकल्यामुळे अध्यक्ष म्हणून आयएएस अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. शिर्डी संस्थानवरही मुख्यमंत्र्यांनी विश्‍वस्त नेमले, पण शिवसेनेच्या सदस्यांनी अद्यापही कार्यभार घेतलेला नाही. शिर्डी संस्थानचे उपाध्यक्षपद शिवसेनेला देणार, असे भाजपने कबूल केले होते पण अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदे भाजपने स्वतःकडे ठेवून शिवसेनेला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विश्‍वस्त सदस्यांनी आपला कार्यभार स्वीकारलेला नाही.
नितीन सांवत – 9892514124