सावदा। पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत ओम कॉलनीतील खुला भूखंड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापिठास उद्यान विकसीत करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला. यामुळे वर्षभरापासूनची मागणी पूर्ण झाली असून उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासह या भागातील रहिवासी, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होईल. अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्गावरील सुमारे 22 हजार लोकसंख्येच्या सावदा शहरात सध्या स्वामीनारायणनगरात स्वामी समर्थ मंदिराला लागून एकमेव उद्यान आहे.
इतर कोणत्याही शहरापेक्षा टुमदार आणि टापटीप असलेल्या सावद्यात शहराच्या इतरप्रमुख भागात उद्यान निर्मिती व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यानुसार वेगवेगळ्या संस्थांनी पालिकेत खुले भूखंड मिळावे, असे प्रयत्न चालवले होते. त्यानुसार 20 मार्चच्या सभेत पोलिकेने ओम कॉलनीतील खुला भूखंड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापिठाला उद्यान विकसीत करण्यासाठी दिला. यासाठी खुल्या भूखंड परिसरातील रहिवाशांची संमतीदेखील घेण्यात आली. यानुसार लवकरात लवकर कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.
24 लाखांचे अनुदान : नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहरात 231 लाभार्थ्यांनी शौचालये बांधली. पैकी 100 जणांना अनुदान अदा करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना निधीअभावी अनुदान देणे अडचणी झाले होते. याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार संबंधितांना 14व्या वित्त आयोगातून अनुदान देण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. यातून सुमारे 23 लाख 85 हजार रुपये अनुदान वितरीत होईल. ही रक्कम पालिकेला नंतर शासनामार्फत प्राप्त होईल. यामुळे शहर हागणदारीमुक्त करण्यास मदत होईल.
समाधीकडे जाण्यासाठी रस्ता तयार होणार
स्वामिनारायण संप्रदायाच्या सावदा येथील मंदिराचे निर्माणकर्ता अक्षरनिवासी शास्त्री पुराणीस्वामी यांच्या समाधीसाठी दिलेल्या जागेवरदेखील रावेर रोडवर उद्यान विकसित होणार आहे. समाधी (छत्री)कडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याचा ठरावही सभेत मंजूर झाला. म्हणजेच ओम कॉलनी आणि रावेर रोडवरील उद्यानांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल.