उद्याने, मैदानांच्या सुरक्षेचे धोरण नाही

0

मुंबई । मुंबई महापालिका दरवर्षी उद्याने व मैदाने यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करते; मात्र, या मैदाने व उद्यानाच्या सुरक्षिततेबाबत पालिकेचे ठोस धोरण नसल्याची स्पष्ट कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेद्वारे विकसित होणार्‍या मैदाने व उद्यानाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत काही कार्यपद्धती आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

वास्तविक, पालिकेच्या मैदाने व उद्याने विकसित केल्यानंतर तेथे सुरक्षारक्षक नेमणे आवश्यक आहे; मात्र माझ्या विभागात एक उद्यान विकसित करताना, मला अनेक अडचणी आल्या. त्या वेळी मला उद्यान विकसित करणार्‍या कंत्राटदार वा महापालिका यापैकी कोणीच मदत केली नाही, अशी तक्रार त्यांनी अध्यक्षांकडे केली होती तसेच स्वत:च्या खर्चानेच खाजगी सुरक्षारक्षक उद्यानाच्या ठिकाणी नेमावा लागला. त्यामुळे पालिकेकडे सुरक्षारक्षक नेमण्याचे काही धोरण आहे की नाही, सुरक्षारक्षक नसल्यास उद्यानाच्या ठिकाणी पालिकेच्या सामानाची चोरी वगैरे होते. याबाबत पालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. पालिकेचे सुरक्षारक्षक नेमण्याबाबत काहीतरी नियम असतील.