उद्योनगरीत दोन महिन्यात 81 वाहनांचा ‘चुरा’

0

पिंपरी : उद्योगनगरी असलेले पिंपरी-चिंचवड शहर सुसंस्कृत म्हणवून घेणारे असले, तरी शहरातील कायदा-सुव्यवस्था बघता राडा संस्कृती वाढीस लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागील एप्रिल व मे या दोन महिन्यामध्ये याच उद्योगनगरीत नऊ तोडफोडीच्या घटनांमध्ये तब्बल 81 वाहनांचा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या टवाळखोरांनी चुरा केला आहे. केवळ किरकोळ वादातून आणि दहशद माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करून हैदोस घालण्याची प्रवृत्ती बोकाळली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत शहरात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

महिनाभरात 37 वाहने फोडली
पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढता आहे. हा आलेख कमी होण्यासाठी कुठलीही यंत्रणा सक्षम असल्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. त्यामुळे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत, कट रचणे, गावठी कट्टे, पिस्टल बाळगणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. केवळ दहशत निर्माण करण्याच्या आणि एखाद्या घटनेत जुन्या भांडणाच्या रागातून वाहनांची तोडफोड केली जात आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सुमारे 20-25 जणांच्या टोळक्याने 15 एप्रिल रोजी 30 वाहनांची तोडफोड केली. त्याच रात्री मिरवणुकीत नाचू न दिल्याच्या कारणावरून पिंपरीत एकाला मारहाण करत 5 वाहनांची तोडफोड केली. 24 एप्रिल रोजी निगडी भागातील घरकुल परिसरात दोन टेम्पोच्या काचा फोडल्या. महिनाभरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 37 वाहनांची तोडफोड झाल्यानंतर वाकड पोलिसांनी तोडफोड करणार्‍या 19 वर्षीय 4 तरुणांना अटक केली.

तोडफोड करणारे अद्याप फरार
मे महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात सहा तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यामध्ये सुमारे 44 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पहिली घटना 3 मे रोजी किवळे परिसरात घडली. 15 जणांच्या टोळक्याने हातामध्ये कोयते, लाकडी दांडके, हॉकी स्टिक अशी घातक शस्त्रांनी सहा वाहनांची तोडफोड केली. यामध्ये ओम्नी कार, बजाज पल्सर, टाटा नॅनो, स्कुटर, होंडा सिटी कार या वाहनांचा समावेश होता. दुसरी घटना 16 मे रोजी पिंपरीतील नेहरूनगर परिसरात घडली. पिंपरी येथील नेहरूनगर, विठ्ठल नगर परिसरात 10-12 जणांच्या टोळक्याने रस्त्याच्या बाजूला उभी केलेली 12 वाहने फोडत दोन जणांवर वार केले. 17 मे रोजी पिंपरी पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली. इतर आरोपी अद्यापही फरारच आहेत.

तिसरी घटना 24 मे रोजी थेरगाव परिसरात घडली. या घटनेत तिघांनी मिळून एका युवकाला लुटून 7 वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर 25 मे रोजी देहुरोड परिसरात पुन्हा एखदा टोळक्याने धुडगूस घातला आहे. टोळक्याने तलवार, कोयते, हॉकी स्टिक घेऊन रेल्वेस्टेशन परिसर, अबुशेठ रोड परिसरातील रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. यामध्ये सहा गांड्याची तोडफोड झाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून देहूरोड पोलीस अजूनही तपासच करीत आहेत. त्यानंतर मागील दोन दिवसांखाली 27 मे रोजी निगडीमधील यमुनानगर येथे अज्ञात टोळक्याने 11 वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सामाजिक सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
घटनांमुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये व्यवस्थेविरोधात नाराजी पसरत चालली आहे. पोलीस यंत्रणा नेमकी कुठे कमी पडतेय, नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, समाजविघातक प्रवृत्तींना सुधारण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत, अशा प्रश्‍नांचा वेळीच उहापोह व्हायला हवा. त्यावर पोलीस यंत्रणेने विचार करून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा सुरू असलेला हैदोस थांबणार नाहीच, परंतु आणखी गुन्हेगारांचे धाडस नक्की वाढेल, अशी भिती आता नागरिकांना वाटू लागली आहे.