मुंबई : ‘मला राजकारणात 25 वर्ष झाली पण माझी संपत्ती वाढली नाही. तुम्ही सांगा, साहेब किंवा त्यांचे बोलके पोपट हे त्यांची संपत्ती घोषित करणार? 25 वर्षाच्या राजकारणात माझे दामन साफ आहे. पण जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्यांवर दगड फेकू नये.’ अशी घणाघाती टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. ते साकीनाका येथील सभेत बोलत होते. ‘शिवसेनेचे मराठी प्रेम कुठे, यांची एकच नीती मराठी माणसाच्या नावाने संघर्ष करत आपण श्रीमंत व्हायचे आहे.’ अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केली.
अहवाल वाचला असता तर आरोप नसते केले
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेने त्यांच्यावर केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपालाही उत्तर दिले. ‘विलासराव देशमुख यांनी आम्हाला तेव्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही पुरावा नसताना आयोगाने अहवाल मांडला. पण हा अहवाल मान्य करता येणार नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेच्या बोलक्या पोपटाने हायकोर्टाचा अहवाल वाचला असता तर आरोप केले नसते. असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘खंबाटाप्रकरणी शिवसेनेची सौदेबाजी’
यावेळी खंबाटाप्रकरणात शिवसेनेनं सौदेबाजी केली असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. ‘खंबाटाप्रकरणी मी अधिक चौकशी केली. त्यावेळी मला समजले की, 2014 साली शिवसेनेच्या युनियन प्रमुखांनी तिथे सौदेबाजी केली. आजही 22 शाखा प्रमुखांना खांबटाकडून पगार मिळतो.’ असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
‘मध्य वैतरणा धरणाच्या कामात भ्रष्टाचार’
मध्य वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. कामाची किंमत 1329 कोटी होती. काम 42 महिन्यात पूर्ण करायचे होेते, ते झाले नाही. तब्बल 921 कोटी जास्त लागले. त्यासाठी दोषी कोण? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला विचारला.