उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीमेत लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी

0

24 लाख रुपयांच्या लक्षाकांसाठी कृषी विभागाकडे तब्बल 112 अर्ज प्राप्त

भुसावळ- कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत ट्रॅक्टर व शेती अवजारे खरेदीच्या अनुदानासाठी तालुका कृषी विभागाने पात्र शेतकर्‍यांकडून अर्ज मागवले होते. यामध्ये प्रमाणापेक्षाही अधिक 112 अर्ज प्राप्त झाल्याने तालुका कृषी विभागाने गुरूवारी कार्यालयात अर्ज प्राप्त झालेल्या शेतकर्‍यांची बैठक घेवून लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी तयार केली. यामुळे प्रतीक्षा यादीप्रमाणे शेतकर्‍यांना अनुदान वितरीत केले जाणार आहे.

24 लक्ष अनुदानचा लक्षांक
शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत शेतकर्‍यांना ट्रॅक्टर व शेती अवजारे खरेदीसाठी अनुदान वितरीत केले जाते यासाठी भुसावळ तालुका कृषी विभागाला सन 2019 अंतर्गत 24 लाख रुपये अनुदानाचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार कृषी विभागाने तालुक्यातील शेतकर्‍यांना 15 एप्रिल 2018 अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते मात्र कृषी विभागाकडे लक्षांकापेक्षाही अधिक तालुक्यातून 112 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी 55 तर शेती अवजारे खरेदीसाठी 57 अर्जांचा समावेश आहे. यामुळे गुरूवारी तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अर्जदार शेतकर्‍यांची कृषी विभागाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान वितरीत केले जाणार असल्याचे सांगितले. शिवाय शेतकर्‍यांना योजनेच्या अटी व नियमांबाबत माहिती देवून उपस्थित अर्जदार शेतकर्‍यांसमोर लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, भारंबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी धांडे यांची उपस्थिती होती.

अशा आहेत नियम व अटी
अनुदानीत लाभार्थी शेतकर्‍यांना आठ ते सत्तर एचपी पर्यंत ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त एक लाख 25 हजार अनुदान दिले जाईल. व इतर शेती अवजारे खरेदी एस.सी.एस.टी.अल्पभुधारक व महिला लाभार्थीसाठी 50 टक्के तसेच इतर लाभार्थीसाठी 40 टक्के अनुदान जीएसटी वगळून दिले जाणार आहे. शिवाय कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील पती, पत्नी किंवा त्यांच्या अविवाहित अपत्याचा समावेश असणार आहे. या व्यतिरीक्त शेतकर्‍यांने स्वत:च्या बँक खात्यातून अदा करणे बंधनकारक आहे.