धुळे। धुळे तालुक्यातील पाडळदे येथे तालुका कृषी अधिकारी धुळे व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत शेती समृध्द शेती अभियान 2017-18 ग्रामस्तर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत कामांचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. त्यांच्या हस्ते पाडळदे ता. धुळे येथे गाववार जमिनीचा निर्देशांक व त्यानुसार द्यावयाची खताची मात्रा स्कोअरबोर्डचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जलदुत राजधर झुलाल महाजन व निमेश राजधर महाजन यांचा सत्कारही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
कंम्पार्टमेंट बंडींग करणे अत्यंत आवश्यक
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, धुळे बाजार समितीचे संचालक अशोक वना राजपूत, पाडळदे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी उपविभागीय अधिकारी पी.एम.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी गागरे, मंडळ अधिकारी रमेश पोतदार, कृषी विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पांढरपट्टे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कंम्पार्टमेंट बंडीग कामामध्ये येथील ग्रामस्थांचा सहभाग व प्रशासनास सहकार्य करण्याची वृत्ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. भुजल पातळी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई सारख्या परिस्थितीला गावाला सामोरे जावे लागते. पिण्याचे पाणी व सिंचनाचे पाणी याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून कंम्पार्टमेंट बंडीग करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील वर्षी आपल्या गावातील विहीरींची पाण्याची पातळी निश्चितच वाढलेली आपणास दिसेल. आपणास शेतकरी समृध्द करायचा आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे आवश्यक आहे. पारंपारिक शेती करण्यापेक्षा नवनवीन पध्दतीने पीक घेऊन आपल्या उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी सोयाबीन, हरभरा यासारखी पीके घेणे आवश्यक आहे. ज्यापासून आपली आर्थिक उन्नती होईल असे डॉ.पांढरपट्टे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी रमेश पोतदार यांनी केले.