यावल। सन 2015 मध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने 2016 च्या उन्हाळ्यात यावल शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार करत शहरातील वापरात नसलेल्या 10 पैकी सहा विहिरी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवला होता. सुमारे 10 लाख खर्चाच्या या कामाकडे नंतर दुर्लक्ष झाले. यंदादेखील हे काम मागे पडले. तहान लागल्यावर ऐनवेळी विहीर खोदण्यापेक्षा उपलब्ध जलस्त्रोतांकडे जिल्हा प्रशासन का दुर्लक्ष करते? हतनूरच्या आवर्तनात अडचणी आल्यास करायचे काय? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
मार्च 2016 मध्ये करण्यात आला टंचाई कृती आराखडा
सन 2016 मध्ये यावलमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. अशा स्थितीत हतनूरमधून वेळेवर आवर्तन मिळाल्यास अडचणी येऊ शकतात, या अंदाजाने पालिकेने मार्च 2016 मध्ये टंचाई कृती आराखडा तयार केला होता. त्यात पालिका हद्दीतील 10 पैकी सहा बंद विहिरी पुनर्जीवित करून शहराची तहान भागवणे नियोजित होते. यासाठी सुमारे दहा लाखांपर्यंत खर्च अपेक्षित होता. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आला. मात्र, हतनूरने आवर्तन दिल्याने टंचाई दूर झाली होती.
विहीर दुरुस्तीचार आराखडा रेंगाळला
यानंतर विहिरींच्या दुरुस्तीचा आराखडादेखील रेंगाळला होता. यंदा टंचाई नसली तरी पालिकेने विहिरींची दुरुस्ती करावी, अशी शहराची अपेक्षा होती. मात्र, त्याविषयी हालचाली नसल्याने दुरुस्तीसाठी केलेले सर्वेक्षणदेखील वाया गेले आहे.
निधी उपलब्ध नाही
शहरातील सहा जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यात टचांईसदृश स्थिती नसल्याने जिल्हा टंचाई निवारण कक्षाकडे यंदा निधीच उपलब्ध नाही. विहिरींची दुरुस्ती किंवा पुनर्जीवनासाठी कुठूनही निधीची तरतूद नसल्याने पालिकेने सांगितले आहे. पालिकेच्याहद्दीत तत्काळ दुरूस्तीनंतर उपयोगात येणार्या विहिरींमध्ये बाहेरपुर्याजवळ ख्वाजा मशीद, सुतारवाडा सिटी सर्व्हे क्र.1010, साने गुरुजी विद्यालय, किल्ल्याच्या आवारातील विहीर, महादेव मंदिराजवळ आणि रेणुकादेवी मंदिरासमोरली विहीर दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. मात्र प्रशासकीय पातळीवरुन या कामाच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.