उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

0

जळगाव । वर्षभरापूर्वी ला.ना. विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याला घराजवळ सायकलवरून पडल्याने मेंदूला मार लागला होता. तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून होता. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पालकांनी त्याच्यावर जळगाव, नाशिक व औरंगाबाद येथील रुग्णालयांमध्ये उपचार केले. मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, वर्षभरापासून मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर शुक्रवारी संपली. उपचारादरम्यान औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्‍वास घेतला. गौरव मुरलीधर पाटील (वय 16) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गेल्या वर्षी ला.ना.विद्यालयात दहावीला शिकत होता. त्याने परीक्षाही दिली होती. सायकलवरून जात असताना घराजवळच तो रस्त्यावर पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला मार बसला होता. त्याचे वडील मुरलीधर पाटील हे रिक्षाचालक आहेत. या अपघातानंतर गौरव अंथरुणाला खिळून होता. त्याचे शाळेत जाणे बंद झाले. तरीही गौरवच्या वडिलांच्या मनात आशेचा किरण कायम होता. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी जळगाव, नाशिक व औरंगाबाद येथे त्याच्यावर उपचार केले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान प्रकृती अधिकच नाजूक झाल्याने 26 जुलै रोजी त्याला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. रात्री 1.30 वाजेच्या सुमारास त्याच्यावर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. तो हसतमुख रहायचा. क्रिकेट व चित्रकलेचा त्याला छंद होता, असे त्याचे मामा नरेंद्र हटकर म्हणाले.