जळगाव। शिवकॉलनी उड्डाणपुलावर एरंडोलकडून येणार्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना 23 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली होती. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ बस रस्त्याच्याकडेला लावून पळ काढला होता. यानंतर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फरार चालकाला जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातून अटक केली आहे.
100 मिटरपर्यंत फरफटत नेले
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयातील ग्रंथपाल राहूल भिकाजी खंडारे (वय 30) मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच-19-बीसी-8945) घराकडे येत होते. मानराज पार्कजवळील नवजीवन मेगा मार्टसमोर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव येणार्या ट्रॅव्हल्सने (क्रमांक एमएच-19-वाय-5091) मागून जोरदार धडक दिली. त्यात खंडारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने बस रस्त्याच्या कडेला लावून पुलाजवळून खाली उतरून पिंप्राळ्याच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बर्हाणपूर येथे झाला होता पसार
अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक संजय कोलत आणि सुभाष पाटील हे दोघे ट्रॅकने भुसावळला गेले. तेथून एका ट्रॅव्हल्सने बर्हाणपूर येथे गेले होते. दोन दिवस बर्हाणपूर येथे राहिल्यानंतर ते गुरुवारी जळगावात आले.
यांनी केली अटक
या प्रकरणी उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे जगन सोनवणे, छगन तायडे, अजित पाटील, अल्ताफ पठाण यांना चालक आणि क्लिनरला पकडण्यासाठी पाठविले होते. गुरूवारी दुपारी ट्रॅव्हल्स चालक संजय बापूराव कोलते (वय 45) आणि क्लिनर सुभाष युवराज पाटील (वय 50, रा. पिंप्राळा) हे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आरटीओ कार्यालयाबाहेर सापळा रचला होता. गुरूवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संजय कोलते आणि सुभाष पाटील हे दोघे रिक्षाने आरटीओ कार्यालयात आले. ते कार्यालयाच्या आवारात शिरताच त्यांना पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.