जळगाव। जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांची सिन्नर पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज शासनाने पारित केले आहे. नंदकुमार वाणी यांच्या जागी अद्याप कुणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. वाणी सध्या रजेवर असल्याने त्यांचा पदाचा अतिरिक्त पदभार डेप्युटी सीईओ राजन पाटील यांच्याकडे आहे.
नोटाबंदी काळात झाली होती चौकशी
गेल्या दोन वर्षापासुन नंदकुमार वाणी हे सामान्य प्रशासन विभागामध्ये रूजू झाले होते. 1987 पासून ते शासनाच्या सेवेत कार्यरत होते. 2007 पासून ते जिल्हा परिषद सेवेत दाखल झाले. नोटाबंदीच्या काळात जिल्ह्यात सीबीआयच्या रडावर असलेल्यापैकी ते एक आहे. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेतून नोटा बदलून घेतल्यांचा संशय असल्याने सीबीआयने त्यांच्या घरासह जिल्हा परिषदेतील कार्यालयात त्यांची चौकशी केली होती. त्यांच्या कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक ग.स.सोसायटीचे माजी संचालक सुनिल सुर्यवंशी यांची देखील सीबीआयने चौकशी केली होती. जिल्हा परिषदेतील एकाच कार्यालयातील दोन अधिकारी सीबीआयच्या रडावर असल्याने हे प्रकरण प्रकाश झोतात आले होते.