उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करा

0

बारामती । महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घालणे अपरिहार्य आहे. तसेच व्यवस्थापनावरील वाढता खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी उपब्लध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करावा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सचिन ढोले यांनी दिले. बारामती परिमंडल कार्यालयात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) संदेश हाके, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बारामती परिमंडलांतर्गत बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांची आवश्यकता, सद्यस्थिती, त्यांचे वेतन व इतर प्रश्‍न, बाह्यस्त्रोत कर्मचारी धोरणाची अंमलबजावणी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रलंबित चौकशी प्रकरणे, पदोन्नती धोरण व नियोजन, प्रलंबित गोपनीय अहवाल निपटारा आदी विषयाबाबत ढोले यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. बहुतांश विषयाबाबत बारामती परिमंडलाचे काम समाधानकारक असल्याबाबत त्यांनी कौतुक केले.

कर्मचारी पोर्टल
मनुष्यबळ ही व्यवस्थापनाची संपत्ती असून व्यवस्थापनाच्या हितासाठी मानव संसाधन विभागाने कर्मचार्‍यांचे सर्व प्रकारचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ निकाली काढण्यावर भर द्यावा. जेणेकरून कर्मचारी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करेल. महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आस्थापनाविषयक बाबी व इतर अशा 60 ते 65 प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणारे कर्मचारी पोर्टल लवकरच सुरू करण्यात येत असून, सर्व काम पेपरलेस होणार असल्याचे सूतोवाच सचिन ढोले यांनी केले.

प्रलंबीत प्रकरणे निकाली काढा
उपविभागनिहाय बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांचा सेतू तयार करून आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ज्यातून नियमित कर्मचार्‍यांना ज्यादा वेळ काम केल्याबद्दल द्याव्या लागणार्‍या अधिकच्या पैशांची बचत होऊ शकेल इ. महत्त्वाच्या सूचना ढोले यांनी बैठकीदरम्यान दिल्या. मंडलांच्या अधीक्षक अभियंत्यांनी मानव संसाधन, वित्त व लेख विभागाकरीता दिवसभरातील तासभर वेळ काढून आढावा घ्यावा. तसेच परिमंडळांतर्गत शिस्तभंग कारवाईची अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत ती वेळेत निकाली काढावीत. त्याचबरोबर गोपनीय अहवालही वेळेत लिहावेत, अशा सूचनाही ढोले यांनी दिल्या. मानव संसाधन विभागाला भेडसावणार्‍या अडचणींचाही मागोवा घेत आपण त्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू, असे आश्‍वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.