उपसा सिंचनची चाचणी यशस्वी

0

भुसावळ- तापी नदीवरील बहुप्रतिक्षीत वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची आठवडाभरात दुसर्‍यांदा करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली असून ओझरखेडा धरणात पाणी पोहोचल्याने समाधान व्यक्त होत आहे. ओझरखेडा धरणामुळे भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांमध्ये हरीतक्रांती होणार असून शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पाठपुराव्याला आले यश -आमदार संजय सावकारे
तळवेल उपसा सिंचन योजनेचा या परीसरातील शेतकर्‍यांना अतिशय फायदा होणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी योजना मंजूर झाली होती. विधानसभेत या योजनेच्या पूर्णत्वासाठी सातत्याने आवाज उठवल्यानंतर योजना आपल्याच प्रयत्नाने मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. योजनेच्या चाचण्यांना यशस्वी सुरुवातझाली आहे. पावसाळ्यात जलपातळी वाढून शेती क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी योजना होणार कार्यान्वित
फीडर चार्ज करून योजनेची चाचणी घेत पाणी ओझरखेडा धरणात सोडणे सुरू आहे. येत्या पावसाळ्यात ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. यानंतर भुसावळ व बोदवड तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांना पीके घेणे शक्य होणार असून पर्यायाने हा परीसर सुजलाम सुफलाम होईल, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. तापी नदीवरील तळवेल-उपसा सिंचन योजना शेतकर्‍यांचे दीर्घकाळापासूनचे प्रलंबित स्वप्न आहे. अडीच वर्षांपूर्वी या योजनेच्या पाईप लाईनचे काम तर वर्षभरापूर्वी वीज जोडणी झाली होती. तत्पूर्वी, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाने दिलेल्या 170 कोटी रुपयांच्या सहकार्याने ओझरखेडा धरणाचे कामदेखील पूर्णत्वास आले होते.

असे आहे योजनेचे स्वरूप
हतनूर धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पंपाद्वारे लिप्टींग करून ते ओझरखेडा धरणात साठवायचे व नंतर हेच शेतीसाठी वितरीत करणे, असे एकूणच योजनेचे स्वरूप आहे शिवाय दीपनगरच्या प्रकल्पासाठी हे पाणी राखीवदेखील ठेवण्यात येणार होते. योजनेसाठी 132 केव्ही उपकेंद्राची उभारणीदेखील करण्यात आली आहे.