बोदवड । बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकर्यांनी तहसीलदार थोरात यांची भेट घेवून केली. तालुक्यात सिंचनाची व्यवस्था नाही. यामुळे बोदवड उपसा सिंचन योजना आकारास आल्यास अवर्षण प्रवण क्षेत्रातील तालुक्याचा कायापालट होईल, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. यादृष्टीने 2178 कोटी 67 लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेल्या योजनेला 500 कोटींचा विशेष निधी दिला होता.
पाच तालुके ओलिताखाली येणार
दरम्यान, योजनेला मंजुरी मिळाली तेव्हाच तिचे काम 2015/16 या वर्षात पूर्ण करावे, असे आदेशित केले होते. मात्र, जळगावमधील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि विदर्भातील दोन अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या योजनेची अजून विटही हललेली नाही. ही योजना पूर्ण झाल्यास पाचही तालुक्यांमधील 42 हजार 420 हेक्टर जमीन बारमाही ओलिताखाली येईल. या उद्देश डोळ्यासमोर ठेवून योजनेचे काम सुरू करावे, अशी मागणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. निवेदनावर मधुकर पाटील (मानमोडी), दगडू शेळके (सुरवाडा), नाना पाटील (बोदवड), पुरुषोत्तम पाटील (वराड), संतोष पाटील (नांदगाव), राजेंद्र चौधरी, संदीप चिंचोले, समाधान माळी, जगन भोई आदींच्या स्वाक्षर्या आहेत.