उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

0

कमलेश चासकर, दुर्योधन भापकर की कार्तिकी हिवरकर

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांनी सोमवारी (दि.18) आपल्या पदाचा राजीनामा दिला. सावंत यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्या नंतर नुतन उपाध्यक्ष निवडीच्या हालचालीस वेग आला असुन कमलेश चासकर, दुर्योधन भापकर व महिला सदस्या कार्तिकी हिवरकर यांची नावे उपाध्यक्षपदी स्पर्धेत असलेले सदस्य यांच्या पैकी कोणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार या बाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ती जागा रिक्त आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गेले 17 महिने कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणारे अभय सावंत यांनी सोमवारी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 17 जानेवारी 2017 रोजी त्यांनी उपाध्यक्षपदा चा पदभार स्विकारला होता.15 जानेवारी 2015 रोजी कॅन्टोन्मेंट निवडणूक पार पडल्यानंतर 17 मार्च 2015 ला कांबळे यांनी प्रथम उपाध्यक्षपदाची धुरा संभाळली. 9 जानेवारी 2017 ला त्यांनी राजीनामा दिला. सलग 22 महिने कांबळे हे उपाध्यक्षपदी यशस्वीरित्या काम करीत होते. मात्र सावंत याच्या राजीनाम्यानंतर नुतन उपाध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालीस वेग आला आहे

पहिल्या महिला होण्याचा मान
उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले व ज्यांना अनेकवेळा या पदाची हुलकावणी दिली असे सदस्य कमलेश चासकर यांचे नाव आघाडीवर आहे. हुशार व चाणाक्ष म्हणुन ओळखले जाणारे सदस्य दुर्योधन भापकर हे देखील उपाध्यक्षपदाची बाजी मारु शकतात. या गटातील महिला सदस्या कार्तिकी हिवरकर यांनाही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची प्रथम महिला उपाध्यक्षा होण्याची सुवर्णसंधी आहे. या संधीचे सोने करण्याची जबाबदारी सर्वस्वी सर्व सदस्यांच्या मानसिकतेवर व निर्णयावर अवलंबून आहे. पुणे व देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षपदी महिला सदस्यांची ऐतिहासिक अशा स्वरुपाची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता निवडणुकीसाठी आपली वर्णी लागेल की काय, असे हिवरकर यांना वाटते आहे. पहिली महिला उपाध्यक्षा होण्याचा हा बहुमान मिळाल्यास आपण पूर्ण योगदान देऊन काम करू असे त्यांचे म्हणणे आहे.

आठ-दहा दिवसांचा कालावधी
आतापर्यंत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून अद्याप एकदाही महिला सदस्यास उपाध्यक्षपदायसाठी संधी दिली नव्हती. त्यामुळे यावेळेला काय घडणार याकडे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासह सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच महत्वाच्या जागांवर महिलांना संधी दिली जाते. सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात महिला सर्व ठिकाणी आघाडीवर यशस्वीरित्या कामगिरी करीत आहे. महिलांकरीता निवडणूक प्रक्रीयेत सहभागी होण्याकरिता आरक्षणाचे धोरण शासनाने राबविले आहे. त्या पार्शभूमीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रथम उपाध्यक्षपदी महिला सदस्याची नियुक्ती झाल्यास हा एक ऐतिहासिक निर्णय होईल. सावंत यांनी राजीनामा दिल्या नंतर त्यांचा राजीनामा स्वीकारून नुतन उपाध्यक्षपदाची नियुक्ती करण्याकामीच्या प्रक्रीयेस बोर्ड प्रशासनास साधारणपणे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.