औरंगाबाद। महापालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम यांचे भाऊ मंगेश निकम यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना फोनवरून चक्क ‘ठोकण्याची’धमकी दिली. यापुढे माझ्या भावाला त्रास दिल्यास ‘ठोकून’काढल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भीत इशाराही दिला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नगरसेवक जंजाळ यांनी पोलीस ठाणे गाठून मंगेश निकमविरुद्ध तक्रार दिली.
पदभार काढण्याचा निर्णय
शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. या विभागाचे प्रमुख उपायुक्त रविंद्र निकम यांची उचलबांगडी करावी अशी मागणीही महापौरांकडे करण्यात आली. महापौर बापु घडामोडे यांनीही प्रशासनाला निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागाचा पदभार काढण्याचा आदेश दिला. सभागृहाने निर्णय घेतल्यानंतर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही निकम यांच्याकडील पदभार काढून तांत्रिक कक्षप्रमुख एम. बी. काझी यांच्याकडे सोपविला. सर्वसाधारण सभेत निकम यांच्याविरोधात निर्णय गेल्याने त्यांनी स्वत:च टेबल वाजवून स्वागत केले होते. या कृतीवर नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला होता.
वेळ पडल्यावर येईनही…
दरम्यान, रविवारी जंजाळ कार्यालयात बसलेले असताना त्यांच्या मोबाईलवर उपायुक्त निकम यांचा भाऊ मंगेश निकम याने फोनवर माझ्या भावाला अजिबात त्रास द्यायचा नाही, नाही तर मी ‘ठोकून’देईन असे सांगितले. जंजाळ यांनी आत्ताच ये म्हणताच वेळ पडल्यावर येईनही असा इशारा दिला. जंजाळ यांनी मोबाईलचे संभाषण पोलीसांना ऐकवले. त्यानंतर रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. खासदार खैरे समर्थक व विरोधक गटाच्या राजकारणातून हा वाद उद्भवल्याची चर्चा आहे.