भुसावळ/पारोळा : पेट्रोल पंपावर थांबलेल्या कंटेनरमधून चोरट्यांनी सुमारे साडेचार लाखांचे मोबाईल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कंटेनरमधून साडेचार लाखांचे फोन लांबवले
अमरावती येथील योगेश तेजरावजी खवशे यांच्या मालकीच्या टाटा कंपनीच्या कंटेनरवर चालक म्हणून नसीमोद्दीन बाहोद्दिन खान (51, रा.बडनेर गंगाई, जि. अमरावती) हे कामास आहेत. भिवंडीहून त्यांनी कंटेनर (एम.एच.48 ए.जी. 7208) मधून शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिओ कंपनीचे मोबाइल व इतर साहित्य घेवून नागपूरकडे निघाले. रविवार, 13 रोजी पहाटे 4.45 वाजता तुराटखेडा-मराठखेडे शिवारात कंटेनर आल्यानंतर भारत पेट्रोल पंपाजवळ चालक झोपण्यासाठी थांबले मात्र त्यानंतर ते खाली उतरल्यानंतर त्यांना कंटेनरच्या मागील गेटचे सील व लॉक तुटलेले दिसले. दरम्यान, 14 रोजी सायंकाळी गाडी मालक योगेश खवशे व कंपनीचे स्टोअर मॅनेजर अतुल सौंदाणे यांनी कंटेनरची तपासणी केली असता चार लाख 55 हजार 440 रुपयांचे 80 जिओ कंपनीचे नेस्ट फोन चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.