नवापूर: तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन उमराण (ता. नवापूर) येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत गुरुवारी, ११ जूनला दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना
खरीप पीक कर्ज हवे असेल त्यांनी किंवा काही अडचणी असतील अश्या शेतकऱ्यांनी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात पंचायत समितीचे माजी सदस्य गावित यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक
मेळाव्यात तालुका व जिल्हास्तरीय सर्व बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील शंभर टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने उमराण
येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खरीप कर्ज वाटप शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे किंवा अडचण आहे त्यांनी कागदपत्रांसह १० जूनच्यापूर्वी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात संपर्क करावा.
शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी व फेर कर्ज घेण्यास पात्र होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना व आतापर्यंत कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना तसेच पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणे हे शासनाचे धोरण आहे. खरीप कर्ज एक लाखापर्यंत घेतल्यास आणि ३१ मार्चपूर्वी परतफेड केल्यास शेतकऱ्यांना कर्ज बिनव्याजी उपलब्ध होते. तसेच दोन ते तीन लाखापर्यंत कर्ज फक्त तीन टक्के निधी उपलब्ध होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेणे आवश्यक आहे. या खरीप हंगामसाठी सर्व शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे, यासाठी संबंधित यंत्रणेने गावपातळीवर कर्जवाटप मेळावे आयोजित करावे व सर्व कर्ज वाटप करावे कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा, असे शासनाने जाहीर केलेले आहे.
खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बॅंकांचा आढावा घेण्यात आला. परंतु पीक कर्ज वाटप समाधानकारक झाल्याचे दिसून आले नाही. याबाबत संबंधित बँकांना विचारणा केली असता शेतकरी कर्ज घेण्यास उत्सुक नाहीत. आम्ही कर्ज द्यायला तयार आहोत. परंतु शेतकरी कर्ज घ्यायला तयार नाहीत असे सांगण्यात आले. तथापि शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही. अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांसाठी खरीप पीक कर्ज वाटप मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य जालमसिंग गावित यांनी केले आहे.