मुंबई- उमरेड (जि. नागपूर) येथे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह आवश्यक 19 पदांची निर्मिती करण्यास बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यातील नागरिक आणि पक्षकारांची मोठी सोय होणार आहे. न्यायदान प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये नवीन न्यायालयांच्या निर्मितीचा समावेश होतो. त्यामुळे उमरेड येथे नव्याने दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या न्यायालयात नागपूरच्या दिवाणी न्यायालयातील (वरिष्ठ स्तर) 2084 प्रकरणे हस्तांतरित होणार आहेत.
प्रस्तावित दिवाणी न्यायालयासाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेनुसार 19 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पहारेकरी तथा सुरक्षारक्षक व सफाईगार या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यात येतील. नवीन न्यायालयाच्या स्थापनेसाठी वार्षिक आवर्ती साडे ब्यान्नव लाख आणि अनावर्ती 20 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.