उमवितील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमानिमित्त पुणे भेट

0

जळगाव । पत्रकारिता अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यास दौरा करणे हे अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अनिवार्य असते. त्यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा संपन्न झाला असुन विद्यार्थ्यानी अभ्यासक्रमानिमित्त पुणे शहराला भेट दिली. अभ्यासदौर करीत असतांना विद्यार्थ्यानी पुणे शहरातील विविध नामांकीत तसेच पर्यटन स्थळांना भेट दिली. पत्रकारिता शिक्षणात प्रसारमाध्यमांबद्दल माहिती असणे गरजेची असल्याने पुण्यातील स्थानिक प्रसारमाध्यमांची माहिती जाणुन घेतली.

एफटीआयआय ला भेट

पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था असुन ती पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे. या ठिकाणी चित्रपट निमित्तीसंबंधी प्रशिक्षण देण्यात येत असते. उमवीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासदौर्‍याप्रसंगी या संस्थेला भेट देऊन यासंस्थेविषयी माहिती जाणुन घेतली. संस्थेतील कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्याना रेडीओ कम्युनिटी, स्टुडीओ, कॅमेरा हाताळणी, चित्रपट निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली.

यांनी केले नियोजन

अभ्यास दौर्‍याप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत प्रा.राहुल कापुरे उपस्थित होते. अभ्यासदौर्‍यासाठी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख डॉ.तुकाराम दौड, प्रा.सुधीर भटकर, प्रा.संदिप केदार यांचे सहकार्य लाभले. अभ्यास दौर्‍यासंबंधी गेल्या काही दिवसांपासुन उमवी पत्रकारिता विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी नियोजन करीत होते. पुणे येथील अभ्यासदौर्‍याचे नियोजन वसंत कुलकर्णी, प्रियंका ठाकुर, सचिन गोसावी, भुषण सोनजे, वाल्मिक जोशी, ज्ञानेश्‍वर थोरात, अमोल कासार, आकाश जगताप, उमेश करंदीकर, घनश्याम पाटील, प्रविण ब्राम्हणे, योगेश पाटील, जितेंद्र ठाकुर, विजय बाविस्कर यांनी केले.

एैतिहासिक स्थळ

पुणे शहरातील आणि शहराच्या आजुबाजुला असणार्‍या एैतिहासिक स्थळांना अभ्यासदौर्‍यानिमित्त विद्यार्थ्यानी भेट दिली. पुर्ण शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पेशवे कालीन शनिवार वाड्याला विद्यार्थ्यानी भेट दिली. शनिवार वाड्याविषयीचा इतिहास यावेळी जाणुन घेतली. तसेच शनिवार वाड्यात रोज सायंकाळी कारंजांच्या माध्यमातून पेशवे कालीन इतिहासाची माहिती देण्यात येत असते. याचाही विद्यार्थ्यानी आनंद घेतला. तसेच पुर्वीचे कोंढाणा किल्ला असलेला आणि तानाजी मालुसरे प्रकरणानंतर सिंहगड नामकरण झालेल्या गडाला भेट दिली.