जळगाव (प्रदीप चव्हाण) । सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मे महिन्यात तापमान 45 अंशांपुढे गेले आहे. दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढतच आहे. अशा वातावरणात पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे आणि तापमान जास्त असल्याने पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. तापमानात वाढ झाल्याने पक्षांसाठी पाणी उपलब्ध व्हावा यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे. विद्यार्थी पक्षांना ठिकठिकाणी पाणी उपलब्ध व्हावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी टाकाऊ बाटल्या कापून झाडाला टांगल्या आहेत त्यात विद्यार्थीच पाणी टाकत असल्याने पक्षांची तहान भागविली जात आहे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांची प्राण्याबद्दल असलेल्या भूतदयेचा या ठिकाणी दर्शन होत आहे.
ठिकठिकाणी परळ ठेवले
युवासेने मार्फत 3 मे रोजी विद्यापीठामध्ये पक्षांसाठी दानापाणी अभियान सुरु करण्यात आले. या अभियानात विद्यापीठ परिसरात पाण्याचे परळ लावण्यात आले आहे. कुलगुरुंच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली. ठिकठिकाणी परळ ठेवण्यात आले असून त्यातुन पक्षांसाठी पाणी उपलब्ध होत आहे. वसतीगृह, प्रशाळा, प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी परळ ठेवलेले आहे.
उपहारगृह चालक करतात व्यवस्था
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात धुळे, नंदुरबार, जळगाव या तीन जिल्ह्यातील महाविद्यालये येतात. त्यामुळे विद्यापीठात दररोज येणार्यांची संख्या मोठी असते. ग्रामीण भागातुन येणार्यांना व वसतीगृह तसेच विद्यापीठ परिसरात राहणार्यांसाठी विद्यापीठात ठिकठिकाणी खाजगी उपहारगृह सुरु आहे. उपहारगृह चालक देखील पक्षांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करतात. यातुन माणुसकीचे दर्शन होते.
सुटीच्या काळात भासणार कमतरता
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत असलेल्या प्रशाळेंची सध्या परिक्षा सुरु आहे. काही प्रशाळांची परिक्षा संपली असून उर्वरीत प्रशाळांची देखील लवकरच परिक्षा संपणार आहे. विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून विद्यार्थींच परळ तसेच टाकाऊ बाटल्यांत पाणी टाकतात. परिक्षा संपल्यानंतर सुट्टीत विद्यार्थी घरी जातील तेव्हा मात्र पक्षांना पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.