जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे कंपनीच्या ठेकेदारांकडून गेल्या चार महिन्यापासूनचे पगार दिले गेले नसल्याने सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. पगारासंबंधी विद्यापीठ स्तरावर आणि संबंधीत ठेकेदारांशी वारंवार चर्चा करुनही कंपनी पगार देत नसल्याने गुरुवार 8 रोजी सुरक्षा रक्षकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला परंतु कंपनीच्या मध्यस्थीने दोन दिवसात पगार देण्याचे आश्वासन दिल्याने सुरक्षा रक्षकांनी संप मागे घेतला. मात्र दोन दिवसात पगार न दिल्यास पुन्हा संप करणार असल्याचे सुरक्षा रक्षकांनी हटले. उ.म.वी. अंतर्गत 120 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. विद्यापीठ कर्मचारी वगळता सुरक्षा रक्षकांसहीत इतर सर्व कामगार हे ठेकेदारांमार्फत काम करीत असतात. एैन दिवाळीच्या काळात देखील ठेकेदारांनी कामगारांचे पगार दिलेले नव्हते.
विद्यापीठ चेक देईल तेव्हा पगार करणार
निविदा प्रक्रियेत असे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे की, निविदा घेतल्यानंतर सुरुवातीचे तीन महिन्याचे वेतन संबंधीत कंपनीच्या ठेकेदारांनी करावयाचे असते. कंपनीच्या ठेकेदारांनी कामगारांचे गेल्या चार महिन्याचे वेतन न दिल्याने कामगारांनी वारंवार विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर कुलगुरुनी एक महिन्याचे वेतन विद्यापीठातर्फे देण्याचे आश्वासन दिले आहे. उर्वरीत वेतन हे संबंधीत कंपनी देईल असे सांगितले. मात्र कंपनी म्हणते की विद्यापीठ चेक देत नसल्याने आम्ही वेतन देऊ शकत नाही. विद्यापीठाने चेक दिल्यास आम्ही लवकरच वेतन देऊ.
सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण नाही
‘स्पोसारा’ या सुरक्षा रक्षक कायद्यान्वये सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते. प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्याशिवाय सुरक्षा रक्षक म्हणून काम करता येत नाही. मात्र विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले गेले नसून नागपूर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येकी 4500 रुपये प्रशिक्षण आणि इतर खर्च म्हणून घेण्यात आलेले आहे.