जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेची एम.ए. मराठी,हिंदी,इंग्रजी या विषयांची प्रवेश प्रक्रिया 19 जून पासून सुरु झाली आहे. प्रशाळेच्या अंतर्गत या शैक्षणिक वर्षापासून भाषांतर, पटकथा लेखन व मुद्रीत शोधन असे तीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील नव्याने सुरु करण्यात आले आहेत. तसेच एम.फील (मराठी, हिंदी, इंग्रजी) अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
भाषाविषयांकरीता प्रथम वर्षास 30 व द्वितीय वर्षास 30 अशा एकूण 60 जागा प्रत्येक विषयानिहाय उपलब्ध आहेत. एम.ए.प्रथम वर्षाच्या तासिका 1 जुल पासून नियमित होतील, असे प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी कळविले आहे. भाषा अभ्यास व संशोधन केंद्रात या शैक्षणिक वर्षापासून एम.फील सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याने संशोधन करणार्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
त्याचप्रमाणे तीन महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणात्मक शैली विकसित करण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी मराठी विभागप्रमुख प्रा.म.सु.पगारे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा.मुक्ता महाजन व हिंदी विभागप्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.