पर्यटनमंत्री जयकुमार रावल ; पर्यटन विभाग मार्केटींगमध्ये मागे असल्याची कबुली ; महोत्सवाचा अर्धा खर्च शासन करणार
भुसावळ- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्यासाठी नाथाभाऊंनी आग्रह धरला होता व मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगून असोद्यातील बहिणाबाईंच्या घराची पर्यटन विभाग स्वतंत्र डीपीआर मंजुरीनंतर खरेदी करून तेथे स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आपल्याकडे खरे सोने असलेतरी मार्केटींग नसल्याची अडचण असल्याचे सांगून पर्यटन विभागाच्या बाबतीतही तोच अनुभव आल्याची त्यांनी कबुली दिली. बाहेर देशात पर्यटनाला जाण्याऐवजी आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर पर्यटन असून उदाहरणादाखल त्यांनी चांगदेवच्या बेटाचे उदाहरण देवून तेथेदेखील मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचे थवे येत असल्याचे सांगितले. बहिणाबाई महोत्सवाला यंदाच्या वर्षापासून पर्यटन विभाग निधी देणार असून महोत्सवाचा अर्धा खर्च आपला विभाग उचलेल, अशी घोषणा त्यांनी करीत सारंगखेडा चेतक फेस्टीवलमध्ये महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आधूनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी -कुलगुरू
बचत गटांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उद्देश सफल होत असून बचत गटांना आता आधूनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केले. स्त्री सक्षमीकरणात महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचेही ते म्हणाले.
छोट्या-छोट्या तालुक्यातही व्हावे महोत्सव -गुलाबराव
खान्देशात कुठे-कुठे काय-काय आहे? हे महोत्सवाच्या माध्यमातून चित्ररूपाने पहायला मिळाल्याचा आनंद असून बहिणाबाईंचे गाव असोदा आपल्या मतदारसंघात येत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. खासदार रक्षा खडसे यांनी मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या-छोट्या तालुक्यातही महोत्सव भरवावेत, असे आवाहन त्यांनी त्यासाठी निश्चित सहकार्य करू, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
बहिणाबाई स्वतः एक विद्यापीठ -एकनाथराव खडसे
महोत्सवात 323 बचत गटांनी नोंदणी केली असून दोन दिवसात आकडा साडेतीनशेवर जाणार असून बचत गटांना मार्केट मिळण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून एक कोटींवर उलाढाल होणार असल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. ते म्हणाले की, बहिणाबाई स्वतः एक विद्यापीठ असून त्यांच्या काव्यात अनेक विद्यापीठ सामावले आहेत. प्रत्येक काव्यावर पीएचडी झाले असल्याचे ते म्हणाले.
खर्या अर्थाने महिला सक्षमीकरण -खासदार
ग्रामीण भागातील महिला महोत्सवाच्या निमित्ताने पुढे आल्या असून खर्या अर्थाने महिला सक्षमीकरण होत असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.