’पीएमआरडीए’ करणार रिंग रोड विकसित
पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांमधून जाणार्या रिंग रोडलगत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यास शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) हा रिंग रोड विकसीत केला जाणार असून, टीपी स्कीममुळे भूसंपादनाचा खर्च न करता नागरी सुविधा निर्माण करता येणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ’पीएमआरडीए’ने 110 मीटर रुंदीच्या रिंग रोडची आखणी केली आहे. रिंग रोडसाठी लागणार्या जागा मिळविण्यासाठी त्यालगत टीपी स्कीम विकसीत केल्या जाणार आहेत. ’पीएमआरडीए’ने उरुळी आणि फुरसुंगी या दोन्ही गावांमधून रिंग रोडची आखणी केली होती. त्याचे काम सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने या दोन गावांचा समावेश महापालिकेत केला. त्यामुळे, या ठिकाणी टीपी स्कीम विकसीत करण्यासाठी ’पीएमआरडीए’ला पालिकेच्या मंजुरीची आवश्यकता होती. शहर सुधारणा समितीच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी दिली.
मूलभूत सुविधांचे जाळे
’पीएमआरडीए’तर्फे उरुळीमध्ये एक आणि फुरसुंगीत दोन टीपी स्कीम राबविण्यात येणार आहेत. टीपी स्कीममध्ये जमीन मालकांना त्यांच्या एकूण जमिनीपैकी 50 टक्के जमीन विकसीत भूखंड (फायनल प्लॉट) स्वरूपात परत केली जाते. तसेच, रस्ते-पाणी-वीज यासारख्या मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण केले जाते.