उर्जामंत्र्यांनी मागितला वीज कंपनी कार्यालयांसाठी जागेचा प्रस्ताव

0

भुसावळ –  शहरातील महावितरण कंपनीची चार विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने ती एकाच ठिकाणी आणण्यासंदर्भात आमदार संजय सावकारे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर गुरुवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बावनकुळे यांनी वीज कंपनीच्या कार्यालयासाठी उपलब्ध जागेचा व त्यातील कक्षांसंदर्भात प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत सावकारे व आमदार हरीभाऊ जावळे यांनी शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने होणार्‍या त्रासासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याशी बावनकुळे यांनी तातडीने संपर्क साधत डीपीडीसीतून दोन कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.

* कुर्‍हा सबस्टेशनचे आमदारांनी करावे उद्घाटन
कुर्‍हा येथील ३३/११ केव्ही सबस्टेशनचे उद्घाटन उर्जा मंत्री येणार असल्याचे रखडले होते मात्र बावनकुळे यांनी आमदार संजय सावकारे यांनीच उद्घाटन करावे, असे याप्रसंगी सांगितले. बैठकीला वीज वितरण कंपनीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

* अटलच्या भूमिपूजनासाठी जानेवारीत मुख्यमंत्री येणार
भुसावळातील अटल योजनेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताधार्‍यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमास २६ डिसेंबर रोजी येणार होते मात्र मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरऐवजी जानेवारीत येणार असल्याचे आश्‍वासन देत योजनेच्या प्राथमिक कामांना सुरुवात करावी, असे सांगितल्याचे आमदार सावकारे म्हणाले. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटीलदेखील येणार आहेत.