अंबरनाथ :- पश्चिमेकडील उलनचाळ येथे असलेल्या वेलफेअर सेंटरच्या जागेवर रात्र निवारा बांधण्याच्या कामाचा नुकतेच उदघाटन पालिके तर्फे करण्यात आले,परंतु ह्या जागेवर रात्र निवारा नव्हे तर पूर्वी प्रमाणेच वेलफेअर सेंटर किंवा मंगल कार्यालय बांधण्यात यावे अशी मागणी मनसे तर्फे पालिकेला पत्र देऊन करण्यात आली आहे.
मनसेचे शहर उपाध्यक्ष युसुफ कासीम शेख यांनी एका लेखी पत्राद्वारे पालिकेला सुचविले आहे कि पूर्वी ह्या ठिकाणी वेलफेअर सेंटर होते, जिथे परिसरातील हजारो गरीब व माध्यम वर्गीयांचे लग्न समारंभ संपन्न झाले आहे. सदर परिसरात अनेक गरीब वस्त्या आहेत व येथील लोकांना आपल्या घरातील मंगल कार्यासाठी महागडी हॉल घेण्याची ऐपत नाही म्हणून सदर जागेचा त्यांना चांगला उपयोग होत होता, शिवाय ह्यामुळे पालिकेला काही प्रमाणात उत्पन्न ही मिळत होते, परंतु सदर इमारत ही धोकादायक सिद्ध झाल्यामुळे तिला पाडण्यात आली, तेथील त्या वेळच्या नगरसेविका फातिमा शेख यांच्या कालावधीत येथे नवीन मंगल कार्यालय बांधण्याचा ठराव नगरपालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला असतांना आता अचानक नागरिकाना अंधारात ठेवून सुमारे एक कोटी सत्यांशी लाख रुपये खर्च करून पालिकेतर्फे येथे रात्र निवारा बांधण्याचे ठरविण्यात आले व त्याचे उदघाटन ही करण्यात आले ही अत्यंत खेदाची बाब आहे व याचा मनसेला ठाम विरोध आहे. येथे पूर्वी प्रमाणेच मंगल कार्यालय (हॉल) बांधण्यात यावा अन्यथा मनसेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे.