नवी मुंबई । सिडकोचे उलवे नोडमधील फायर ब्रिगेड स्टेशन आणि कर्मचारी निवासस्थानाची इमारत बांधून फक्त दोन वर्षे झाले असताना या ठिकाणी आतून आणि बाहेरून तडे गेले आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी एका घरात स्लॅब कोसळल्याने भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसली तरी फायरमन आणि त्यांचे कुटुंबीय असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत. उलवे नोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. त्यामुळे या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहताहेत. सध्या या वसाहतीला महत्व प्राप्त झाले आहे. याचे कारण म्हणजे बाजूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू झालेले आहे.
दिवसेदिवस लोकवस्ती वाढत असताना या ठिकाणी पायाभूत सुविधांची मागणी वाढत आहे. रस्ते, पाणी, वीजबरोबरच अग्निशमन यंत्रणा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. याअगोदर आग लागल्यानंतर द्रोणागिरी, नवीन पनवेल, कळंबोलीहून अग्निशमन बंब मागविण्यात येत असे. परंतु, डिसेंबर महिन्यात उलवेमध्ये स्वतंत्र फायर स्टेशन सुरू करण्यात आले. त्याअगोदर येथे आरक्षित जागेवर कोट्यवधी रूपये खर्च करून फायर स्टेशन आणि फायरमन निवासाकरिता इमारत बांधण्यात आली. चार मजल्याच्या या इमारतीत सुमारे 32 खोल्या सिडकोने बांधल्या आहेत. या इमारतीचे वय जेमतेम दोन वर्षांचे असताना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी रात्री एका कर्मचारी राहत असलेल्या सदनिकेचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने त्याचा अंगावर प्लॅस्टर पडले नाही. त्यामुळे दुखापत किंवा इजा झाली नाही. या इमारतीला आत आणि बाहेर तडे गेले आहेत.
फायर ब्रिगेडचे कर्मचारीच असुरक्षित
बाहेरून व्हाइट सिमेंट लावून ते तडे बुजवण्याचा प्रयत्न सिडकोला केला. मात्र सदनिकामधील वरचे स्लॅब कोसळू नये याकरिता उपाययोजना करण्यात आलेली नाही. फायर स्टेशनमध्ये ज्या ठिकाणी बंब उभे करण्यात येतात. तिथेही स्लॅबला तडे गेले असल्याने ते कधी कोसळेल, या नियम नाही असे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. उलवेकरांच्या सुरक्षिततेकरिता रात्र दिवस दक्ष असलेले फायरब्रिगेडचे कर्मचारीच असुरक्षित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्याशी संपर्क साधला असता ही बाब इंजनिअरिंग विभागाच्या अखत्यारीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सिडकोचा या घटनेनंतर सिडकोच्या इंजिनीअरिंग विभागाला कळवण्यात आले होते. मात्र, खाडीतून खारा वारा येत असल्याने अशाप्रकारे तडे गेले असल्याचे उत्तर त्यांनी दिल्याचे समजते. एकंदरीत हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे याकरिता लक्ष दिले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे माहिती पुढे येत आहे.