उल्हासनगरात बनावट नोटा हस्तगत

0

उल्हासनगर । भारतीय चलनातील 500, 100 व 50 रूपयाच्या बनावट नोटा तयार करून त्या आपल्या कब्जात बाळगून त्या नोटा खर्‍या आहेत असे भासवण्याच्या उद्देशाने उल्हासनगर शहरात वटवण्यासाठी आलेल्या 2 जणांना बनावट नोटांसह उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 च्या पोलिसांनी झडप घालून अटक केली आहे. उल्हासनगरातील कॅम्प नं. 3 येथील अ‍ॅम्ब्रोशीया हॉटेलसमोर काही टोळी भारतीय चलनातील बनावट नोटा वटवण्याकरीता येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 चे व.पो.नि. राजेश बागलकोटे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून त्यांच्या पथकातील पोलिसांनी त्याठिकाणी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.

पोलीस ठाण्यात गुन्हा
दोन संशयीत इसम त्याठिकाणी येताच पोसिलांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 500, 100 व 50 रूपयांच्या भारतिय चलानातील बनावट नोटा सुमारे 21 हजार 550 रूपये किंमतीच्या मिळून आल्या. पोलिसांनी त्या नोटा जप्त करून विनोदप्रकाश बच्चनलाल शहा(43) व अरूण गुरव(30) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून त्यांचा आणखील 1 सहकारी गणेश वाघमारे याचेही नाव निष्पन्न झाल्याने त्या तिघांविरूध्द मध्यवर्ती पोलिस ठाण्यात पो.हवा.भरत नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांना केली अटक
बनावट नोटाप्रकरणी विनोदप्रकाश व अरूण या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांनी या बनावट नोटा कुठून आणल्या व आणखीन कोणत्या ठिकाणी या नोटा खर्‍या आहेत म्हणून त्या वटवल्या आहेत याचा आधिक तपास पो.उप.नि.तोरगल करीत आहेत.