उल्हासनगर । शहरातील कॅम्प नं. 4 येथील श्रीराम चौकातील 4 बारमधील छुप्या खोल्यांवर पालिकेने कारवाई केल्याने शहरातील बारचालकांचे धाबे दणाणले आहेत. उल्हासनगरातील 7 ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी बांधण्यात आलेल्या छुप्या खोल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी पालिका आयुक्तांना 22 नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते. या पत्राचा मान राखत श्रीराम चौकातील चार बारवर पालिकेच्या पथकाने पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त युवराज भदाणे यांच्या आदेशाने शुक्रवारी कारवाई केली.
उल्हासनगर परिमंडळचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, प्रभारी उपायुक्त डॉ.युवराज भदाणे यांना पत्र दिले होते. त्यानुसार प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांच्या नियंत्रणाखाली अॅपल, 100 डेज, राखी व गोल्डन गेट या 4 डान्स बारवर कारवाई करण्यात आले असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांनी सांगितले. मनसेचे सचिन कदम यांनी या बारच्या छुप्या खोल्यांबाबत उपायुक्तांना निवेदन पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल पोलिसांनी व पालिकेने घेऊन ती कारवाई केली.