उल्हास नदीवरील मोहने पुलाची दुरवस्था कायम

0

कल्याण। कल्याण व टिटवाळा ग्रामीण अ प्रभाग क्षेत्राला जोडणार्‍या उल्हास नदीवरील पुलाच्या बांधकामाला वृक्षवल्लींनी विळखा घातला आहे. त्यामुळे पुलाची दुरवस्था होत आहे. अ प्रभाग क्षेत्राच्या ग्रामीण भागाला जोडणार्‍या उल्हास नदीवरील एकमेव पूल असून सुमारे 70 वर्षांपूर्वी एनआरसी कंपनीने तो दगडी आर्च ब्रीजचा बांधकामच्या प्रकारात वाहनांच्या रहदारीसाठी बांधला होता. सद्यःस्थितीत या पुलाची दुरवस्था होत आहे. स्टक्चर ऑडिटचा प्रश्‍न उभा राहिला आहे. 2008 मध्ये लाखो रुपये खर्चून इफोक्सी मँईटर मेटीरियल भरून पुलाच्या दगडी बांधकामांचा दर्जा आदी कामे केली.

वाहनचालकांची गैरसोय
कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुलाची डागडुजी केली होती. मात्र, या पुलावर सध्या झाडांनी विळखा घातला आहे. त्यामुळे झाडांमुळे पुलाचे बांधकाम कमकुवत होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. ग्रामीण अ प्रभागाला जोडणार्‍या या पुलावर तसेच बंदर पाडा कॉर्नर ते वडवली 47 नं रेल्वे गेटपर्यंत फक्त पुलाजवळील पोलीस चौकीजवळ पथ दिव्यांची सुविधा आहे. परंतु, पुलावर आणि संदर्भात परिसरात पथदिवे नसल्याने व खड्डेमय रस्ता असल्याने रात्रीच्या वेळेस वाहनांना जाता-येताना मोठी गैरसोय होते.

डागडुजीची मागणी
पुलाच्या बंदर पाड्याच्या दिशेच्या कठड्या लगत संरक्षण कठड्याची मागणीदेखील असून प्रशासन उदासीन असून भविष्यात असलेला धोका ओळखून प्रशासनाने आता तरी उल्हास नदीवरील ग्रामीण अ प्रभाग क्षेत्राला जोडणार्‍या एकमेव पुलाबाबतीत लक्ष देऊन डागडुजी करीत वृक्षवल्लीचा विळखा काढला पाहिजे, अशी मागणी जोर धरू पाहत आहे.

पुलाच्या बांधकामात आलेेेल्या वृक्षांची छाटणी करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यानंतर बांधकामात शिरलेली वृक्षांची मुळे तांत्रिक पद्धतीने काढून डागडुजी करण्यात येणार आहे.
प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता.