उसाला दर वाढवून मिळण्यासाठी आंदोलन

0

इंदापूर । शासनाने एफआरपी वाढवल्यानंतर साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरायला सुरुवात केली आहे. ऊस उत्पादकांसाठी नुकसानदायक असणारा हा प्रकार बंद करावा, सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्ह्याभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी शुक्रवारी (दि.8) वरकुटे बुद्रुक येथे दिला.

जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन
ते म्हणाले, की गाळपास आलेल्या ऊसाला तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र शासनाने जशी जशी एफआरपीची रक्कम वाढवली. तशी तशी साखर कारखानदारांनी साखर उतारा चोरण्यास सुरुवात केली आहे. खरा साखर उतारा दडवला जात आहे. परिणामी एफआरपीची रक्कम कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सरासरी 2400 रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. तो ऊस उत्पादक व रयत क्रांती संघटनेस मान्य नाही. तीन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, होणार्‍या दुष्परिणामांना साखर कारखानदार जबाबदार असतील, असे देवकर म्हणाले.

मंडल अधिकार्‍यांना निवेदन
या वेळी रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली आहेर, जिल्हा संपर्कप्रमुख सर्फराज शेख, तालुकाध्यक्ष अभिमान शिंदे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष समाधान देवकर यांची भाषणे झाली. लोणी देवकरचे मंडल अधिकारी ओव्हळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलकांनी अर्धा तास रास्तारोको केल्याने वाहतूक पूर्ण खोळंबून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या वर्षी गाळपास आलेल्या उसाला तीन हजार रुपयेप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात आंदोलने करण्याच्या रयत क्रांती संघटनेने दिलेल्या इशार्‍यानुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरमधील वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन केले.