चिनी अर्थव्यवस्थेला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच देशांना या अतिविनाशक बाँबविषयी माहिती होती, अमेरिका, रशिया, चीन, जपास, रुस, फ्रान्स, भारत आणि पाकिस्तान अशा या देशांची नावे आहेत. त्यात उत्तर कोरियाचे नाव नव्हते. मात्र, अचानकपणे उत्तर कोरियाचे प्रमुख किम उन यांनी हायड्रोजन बाँबची चाचणी करून अवघ्या जगाला चिंतेच्या खाईत लोटले आहे. कोणत्याही परिणामाची जाणीव नसलेले किम उन यांनी आता अतिविनाशक स्फोटक बनवून अवघ्या जगाला तिसर्या महायुद्धाच्या दाराशी आणून ठेवले आहे. दुसरे महायुद्ध अणुबाँबने संपुष्टात आले आणि त्यानंतर अण्वस्त्रांच्या निर्मितीची स्पर्धा जगभरात सुरू झाली.
आता तिसर्या महायुद्धाचे संकेत उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बाँबच्या चाचणीने मिळाले आहे. ही जगासाठी अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. अमेरिकेसह सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने जगातील सध्या सर्वाधिक शक्तिशाली समजल्या जाणार्या हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. या चाचणीमुळे पूर्व आशियातील समतोल बिघडण्याची भीती भारतासह सर्व देशांनी व्यक्त केली आहे. जपानच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने काही अनपेक्षित भूगर्भीय हालचालींची नोंद केली. त्यानंतर पुंगेई-री आण्विक स्थळाजवळ भूकंपाचे धक्के जाणवले, हे धक्के नैसर्गिक नसल्याची नोंद या वेळी करण्यात आली. तब्बल 6.2 रिश्टर क्षमतेच्या भूकंपसदृश्य हादरे या चाचणीमुळे जाणवले. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी हायड्रोजन बाँबची पहिली चाचणी त्यांच्या वाढदिवशी 2015 साली केली. नव्या वर्षाची सुरुवात हायड्रोजन बाँबच्या रोमांचक ध्वनीने झाल्याचे उन यांनी आपल्या लिखित संदेशात त्यावेळी म्हटले होते. आता दुसर्यांदा चाचणी करून त्यांनी अमेरिकेला आव्हान दिले आहे. यासाठी ब्रिक्स परिषदेचा मुहूर्त त्यांनी निवडला.
आजपासून चीनमध्ये ब्रिक्स परिषदेला सुरुवात झाली, त्याच्या आदल्या दिवशी किम यांनी अवघ्या जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय संतापला असून, संयुक्त राष्ट्रसंघ उत्तर कोरियावर कडक निर्बंध लादू शकतो. या हायड्रोजन स्फोटामुळे उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आणखी गतिमान होणार असून, अमेरिकेपर्यंत पोहोचू शकेल अशा क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी उत्तर कोरियाचे तंत्रज्ञ प्रयत्नशील आहेत. या चाचणीमुळे अमेरिकेच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बाँबची क्षमता ही हिरोशिमामध्ये फुटलेल्या अणुबाँबपेक्षा एक हजार पटीने अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हायड्रोजन बाँब हा अणुबाँबपेक्षाही शक्तिशाली समजला जातो. या बाँबची निर्मितीही तुलनेने अधिक कठीण असते. या बाँबच्या निर्मितीसाठी उत्तर कोरियाचे तंत्रज्ञ मागील दशकभरापासून संशोधन करत होते. मागील तीन वर्षांमध्ये उ. कोरियाने उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमासही वेग दिला असून, डिसेंबर-2012 मध्ये दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. काही तंत्रज्ञांच्या मते अमेरिकेस लक्ष्य करू शकेल, अशा दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान उत्तर कोरियाने अद्याप तयार केलेले नाही; पण या देशाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाबाबत मात्र भीतीयुक्त वातावरण दिसून येते.
उत्तर कोरियाने 2013मध्ये आण्विक स्फोट घडवून आणला होता, विशेष म्हणजे किम जोग उन यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्येही या संभाव्य चाचणीचा साधा उल्लेखदेखील केला नव्हता. या चाचणीची जाहीर वाच्यता केल्यास चीनसोबतचे परराष्ट्रसंबंध बिघडू शकतात तसेच संयुक्त राष्ट्रसंघदेखील काही कडक नियम लादू शकते, ही भीती लक्षात घेऊन या चाचणीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. उत्तर कोरियात तीन पिढ्या हुकूमशाहीला सामोरे जात आहे. या देशात शासन सेंसॉर केलेले वृत्तेच जनतेपर्यंत पोहोचवली जातात. सध्याचे या देशाचे प्रमुख किम जोंग ऊन यांना हुकूमशाहीची परंपरा त्यांचे आजोबा आणि वडिलांकडून मिळाली. त्यांचे आजोबा किम द्वितीय यांना देव मानण्याचा सरकारी आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचे वर्ष आता किम जोंग उन यांच्या आजोबाच्या जन्म दिनापासून सुरू होत आहे. येथे लोकशाही नावापुरती सुरू आहे. कारण निवडणुुकीत मतपत्रिकेवर केवळ एकाच उमेदवाराचे नाव असते. त्यांच्याकडे इंटरनेट हॅकर्सच्या तरुणांची मोठी फौज आहे. त्याला ‘सीक्रेट युनिट 121’ असे नाव देण्यात आले आहे. या टीमने किम यांच्या आदेशानुसार सोनी पिचर’ची इंटरनेटच्या माध्यमातून संगणक हॅक करून सर्व गोपनीय माहिती चोरली, त्यानंतर ती माहिती सार्वजनिक करण्यात आली. किम जोग उन हे जगातील सर्वात तरुण वयाचे शासनकर्ते आहे. जेव्हा त्यांनी राष्ट्रप्रमुखपदाचा स्वीकार केला तेव्हा त्यांनी त्यांचे विरोधक यांना थेट ठार करण्याचे धोरण स्वीकारले. यामध्ये त्यांनी त्यांचे काका आणि काकीचाही खून केला तसेच प्रेयसीचाही खून केला. सध्या त्यांनी त्यांच्या केसाची जी हेअर स्टाइल ठेवली आहे. तशीच सर्व पुरुषांनी करावी, असा फतवाही त्यांनी काढला आहे. असे अत्यंत विकृत स्वरूपाचे किम जोग उन हे परिणामांचा विचार करताना दिसत नाही. ज्या प्रकारे त्यांनी हायड्रोजन बाँबची चाचणी केली आहे. त्यांच्याकडील या अतिविनाशक बाँब असणे अवघ्या जगासाठी त्रासदायक आहे.