ऊस तोड मजुरांची पीकअप नदी पात्रात कोसळून सात जण ठार

0

विंचूर शिवारातील बोरी नदीपात्रात वाहन कोसळले : पाच जण गंभीर : 14 जण किरकोळ जखमी : रस्ता दुरुस्तीसाठी नागरीकांचा रस्ता रोको : चालक पसार

धुळे ः मध्य प्रदेशातील धवल्यागीर येथील ऊस तोड मजुरांना उस्मानाबादकडे घेऊन निघालेली भरधाव पीकअप जीप चाळीसगाव-विंचूर रस्त्यावरील विंचूर गावातील बोरी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात सात जण ठार तर 19 जण जखमी झाले. शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. रस्त्याची झालेली दुरवस्था व त्यातच चालकाला साखरझोप आल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर चालक तसेच मजुरांना घेण्यासाठी आलेले दोघे पसार झाले आहेत. मृतांमध्ये एका पुरूषांसह दोन महिला, तीन लहान मुली, दोन लहान मुले व दोन लहान मुलींचा समावेश आहे.

खडकाळ भागात वाहन आदळल्याने सात जण ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील धवल्यागीर येथून पीकअप (क्रमांक एम.एच.25 पी.3770) मधून ऊसतोड मजुरांना घेवून चालक सागर भारत तांबारे (आंदोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) व मजुर घेण्यासाठी आलेले किरण कवडे व सुजीत तांबारे हे उस्मानाकडे वाहनातून मजूर घेवून जात असताना विंचूर शिवारातील बोरी नदीपात्रात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन नदीपात्रात कोसळले. या अपघातात सात जण ठार तण 19 जण जखमी झाले.

अपघातात यांचा ओढवला मृत्यू
मृतांमध्ये रीतेश लेदाराम आर्य (वय सहा महिने, फिर्यादीचा मुलगा), जिन्याबाई अंबु पावरा (13 वर्ष), मियाली लेदाराम आर्य (23, फिर्यादीची पत्नी), रवीना लेदाराम आर्य (5, फिर्यादीची मुलगी), करण सेवासिंग बारेला (वय 3), हरमसिंग सेवासिंग बारेला (5 वर्ष), लालसिंग अंबू पावरा (20, सर्व रा.धवल्यागिरी, ता.सेंधवा, बडवाणी, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघातस्थळी अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलिस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे, उपनिरीक्षक कैलास चौधरी व धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी धाव घेतली.

ग्रामस्थांचा रस्ता रोको
अपघातानंतर बोरी पुलाच्या दुरुस्तीसह रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको केल्याने काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.