जळगाव । येथील ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये सरला राजेश सोनार (वय 40 वर्ष) मु.पो.वरणगांव रूग्णालयात दाखल झाल्या असतांना त्यांच्या मेंदूच्या सगळ्या अशुद्ध रक्तवाहिन्या बंद झाल्या हे एम.आर.आय.मध्ये दिसून आले. यामुळे रूग्णांच्या मेंदूला इजा होवून रूग्णांची अवस्था अतिशय गंभीर झाली होती. हे डॉ.निलेश किनगे यांच्या लक्षात आले त्यानंतर इन्टरवेन्शन व स्ट्रोक न्युरॉलॉजीस्ट असलेले डॉ.किनगे यांनी रूग्णांच्या मेंदूच्या अशुद्ध रक्तवाहिन्या उघडायचा निर्णय घेतला. मांडीतून बारीक तार टाकून मशिनच्या साह्याने रूग्णाच्या अशुद्ध रक्तवाहिन्या यशस्वीपणे उघडण्यात आल्या.
या शस्त्रक्रियेमुळे मेंदूची कवटी उघडण्याची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता पडली नाही व रूग्णाच्या मेंदूचा रक्तप्रवाह सुरळीत होवून रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे अशी माहिती डॉ.किनगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या हॉटेल केवल कुकच्या जागेतील ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये भारतातील 5 व्या व खान्देशातील पहिल्याच अशुध्द रक्तवाहिनी उघडण्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.किनगे यांनी अशाप्रकारे लकव्यामध्ये मेंदूच्या धमणीमध्ये तार टाकून रक्ताच्या गुठळ्या काढून रक्तप्रवाह सुरळीत करता येतो. या सगळ्या विविध शस्त्रक्रिया ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल करण्यात येतात असे सांगितले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.आश्विनीकुमार काळुंखे यांनी केले. आभार डॉ.वैजयंती किनगे(पाटील) यांनी मानले.