मुंबई । महर्षी दयानंद स्पोर्ट्स, बी.के. फाऊंडेशन, भारतीय जनता पार्टी – बोरिवली व महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांमध्ये एअर इंडिया आणि महिला गटात वैष्णवी संघाने विजेतेपद मिळविले. एअर इंडियाचा मोनू व वैष्णवीची पिंकी राय हे अनुक्रमे पुरुष व महिला गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांनाही प्रत्येकी वीस हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. बोरिवली मुंबई येथील जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडानगरीत झालेल्या या अंतिम व उपांत्य लढतीसाठी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच लढती चुरशीने खेळल्या गेल्यामुळे क्रीडारसिकांनी खेळाचा आनंद मनमुराद लुटला. पुरुषांच्या झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने भारत पेट्रोलियमचा प्रतिकार 33-17 असा सहज परतवत विजय तोडणकर स्मृतिचषकासह तीन लाख रुपयांचा रोख पुरस्कार आपल्या नावे केला. उपविजेत्या पेट्रोलियमला चषक आणि रोख दोन लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. सुरुवातीपासून आक्रमणावर भर देत एअर इंडियाने पेट्रोलियमवर 14 व्या मिनिटाला लोन देत 11-05 अशी आघाडी मिळवली. मध्यांतराला 17-07, अशी भक्कम आघाडी एअर इंडियाकडे होती. मोनू, सिद्धार्थ यांचे आक्रमण थोपवणे पेट्रोलियम संघाला जड गेले, तर विकास काळे, विशाल भारद्वाज यांचा बचाव भेदणे त्यांना कठीण गेले. पेट्रोलियमच्या गिरीश इरनाकने अष्टपैलू खेळ करीत बरा प्रतिकार केला. त्याला दीपचंदनेदेखील साथ दिली. पण संघाला विजयी करण्यास ती पुरेशी नव्हती.
महिलांची निर्णायक लढत एकतर्फी
महिलांचा अंतिम सामनादेखील एकतर्फी झाला. हैद्राबादच्या वैष्णवीने दिल्लीच्या पालमचे आव्हान 34-20असे मोडून काढत अनिल महामुणकार स्मृतिचषक व रोख. तीन लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या पालमला चषक व दोन लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. वैष्णवीने चढाई-पकडीचा जोशपूर्ण खेळ करीत विश्रांतीपर्यंत 17-07 अशी आघाडी घेत आपणच या विजेतेपदाचे दावेदार हे दाखवून दिले. विश्रांतीनंतर आक्रमकतेला मुरड घालत सावध खेळ करीत आघाडी आपल्याकडे टिकून राहील याची काळजी घेतली. पालमच्या रितू व रिचाने उत्तरार्धात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो दुबळा ठरला. वैष्णवीच्या रितू नेगी, मोनिका, पिंकी राय यांच्या झंजावाती खेळाला पालमकडे उत्तर नव्हते. या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात वैष्णवीने एसएमव्हीकेला 39-37 असे, तर पालमने पंजाब राज्यला 25-24असे चकवत अंतिम फेरी गाठली होती. पुरुषांत एअर इंडियाने भारतीय नौदलाला 39-36 असे, तर भारत पेट्रोलियमने महिंद्राला 33-33असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी या चारही संघांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
रितू, विकास, काशिनाथला वैयक्तिक पारितोषिके
महिला विभागात स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीची खेळाडू म्हणून वैष्णवीच्या रितू नेगीची, तर उत्कृष्ट चढाईची खेळाडू म्हणून पालमच्या रितूची निवड करण्यात आली. दोघींना प्रत्येकी रोख दहा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुषांत नौदलाचा विकास उत्कृष्ट चढाईचा, तर महिंद्राचा काशिलिंग आडके उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार गोपाळ शेट्टी, विनोद शेलार, दीपक पाटणकर, भार्गव कदम, गणेश रहाटे, महेश राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.