एकतर्फी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचा संप

0

धुळे । एकतर्फी केलेली पगारवाढ व इतर मागण्यांसाठी एस.टी. कर्मचार्‍यांकडून गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारण्यात आला आहे. अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच आगारातून 391 पैकी 295 बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात एस.टी. महामंडळाचे धुळ्यासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर व दोंडाईचा येथे आगार आहेत. या आगारातून लांब पल्यासह ग्रामीण भागात बसेस सुटत असतात. मात्र एस.टी. कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने त्याचा परिणाम सेवेवर झालेला आहे.

शिरपूर, शिंदखेडा आगारात कडकडीत बंद
शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच आगाराच्या एकूण 295 बस फेर्‍या रद्द करण्यात आलेल्या होत्या. यात धुळे आगाराच्या 39, साक्री 59, दोंडाईचा आगाराच्या 38 बस फेर्‍यांचा समावेश आहे. तर या पाचही आगारातून 96 बसफेर्‍या सुटल्या. त्यात धुळे 86, साक्री 2 व दोडाईचा आगारातून 8 बस सोडण्यात आल्या. शिरपूर आगारातून 112 व शिंदखेडा आगारातून 47 बस दररोज सुटत असतात. मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत या दोन्ही आगारातून एकही बस सुटलेली नव्हती.

खाजगी वाहतूकीत वाढ
कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याची माहिती अनेक प्रवाशांना नव्हती. मात्र सकाळी बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना संपाची माहिती मिळाली. त्यामुळे अनेकांना खाजगी वाहनांनीच प्रवास करावा लागला. एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे खाजगी प्रवाशी वाहतूकदाराची चांदी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच मार्गावर खाजगी प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारण्यात येत आहे.