इंदूर: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. सांघी कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. कमलेश साहू असे या तरुणाचे नाव आहे, त्याने गुरुवारी रात्री तरुणीवर कोयत्याने हल्ला केला आणि तरूणीचा चेहरा, मान आणि पाठीवर तब्बल ३८ वार केले. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि कमलेश एकाच परिसरात राहत होते. शाळेत असल्यापासून कमलेशचे या तरुणीवर प्रेम होते. महाविद्यालयात असतानाही त्याने तरुणीला प्रपोज केले होते. मात्र, तिने नकार दिला. यानंतर संबंधित तरुणी नोकरीसाठी इंदोरमध्ये राहायला आली. तेव्हा कमलेशने फेसबुक लोकेशनद्वारे तिचा पत्ता शोधून काढला व इंदोरमध्ये आला. तरूणीचा नकार ऐकून कमलेशचे मानसिक संतुलन बिघडला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला.
या घटनेनंतर पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेतले आहे.