एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

0

पिंपरी-चिंचवड : एकतर्फीप्रेमातून वाकडमध्ये यवतमाळ येथील भाजप आमदाराच्या मुलीवर तिच्याच वर्गातीलच एका तरुणाने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जिंजर हॉटेलच्या पाठीमागे घडली. या हल्ल्यात मुलीच्या हाताची करंगळी कापली गेली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुलीच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेमुळे वाकड परिसरात एकच खळबळ उडाली होती. अश्‍विनी संजय बोदकुरवार (वय 22, रा. नवलेनगर, वाकड) असे हल्ला झालेल्या आमदाराच्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश परवेशकुमार बक्षी (वय 25, रा. वाकड, मूळ, हरियाणा) याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अश्‍विनी आणि आरोपी राजेश हे वाकड येथील बालाजी महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहेत.

उपस्थितांच्या सतर्कतेने वाचले अश्‍विनीचे प्राण
सोमवारी सकाळी अश्‍विनी हॉस्टेलमधून बाहेर पडत असताना, राजेशने गेटजवळच धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. त्यातून ती बचावली, पण या हल्ल्यात तिची हाताची बोटे कापली गेली. सुदैवाने, ती शरीरापासून वेगळी झालेली नाहीत. वाकड येथील लाइफ पॉइंट रुग्णालयात तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अश्‍विनीची प्रकृती स्थिर असल्याचे आ. बोदकुरवार यांनी सांगितले. या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी राजेश बक्षीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याची कसून चौकशी करण्यात येत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय आहे. अश्‍विनी ही सकाळी हॉस्टेलमधून महाविद्यालयात जात असताना बक्षीने तिचा पाठलाग करून तिच्यावर सत्तूर या धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये तिच्या डाव्या हाताची करंगळी तुटली. वाकडच्या बालाजी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. राजेशने अश्‍विनीवर हल्ला केल्यानंतर त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी त्याला पकडून त्याची धुलाई केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. तिथे उपस्थित असलेल्या एका युवकाने तिला वाचवण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. यामध्ये तो किरकोळ जखमी झाल्याचे समजते. घटनेची माहिती समजताच आमदार बोदकुरवार यांनी तातडीने पुणे गाठले. अश्‍विनीने यासंबंधी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, अशी माहिती आमदार बोदुकरवार यांनी दिली.

महाविद्यालय प्रशासनाकडे केली होती तक्रार
काही दिवसांपूर्वीच अश्‍विनीने राजेश याच्याकडून आपल्याला धोका असल्याचे महाविद्यालय प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर राजेश याच्याकडून यापुढे त्रास देण्यात येणार नाही असे पत्र लिहून घेण्यात आले होते. असे असतानादेखील राजेश याने अश्‍विनीला महाविद्यालयात जात असताना गाठत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त वैशाली जाधव माने हे पुढील तपास करत आहेत.