तळोदा । एकतर्फी प्रेम प्रकरणातून माथेफिरू तरुणाने स्वतःला रॉकेलने जाळून घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र प्राध्यापकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. संबंधित युवकांवर विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, तळोदा येथील महाविद्यालयात तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. सध्या विद्यापीठाच्या एफ. वाय. बी.ए ची परीक्षा सुरू आहेत. काळ 12 ते 2 दरम्यान पेपर सुरू असताना बाळदा येथील एक तरुण मद्यप्राशन करून महाविद्यालयात शिरला. महाविद्यालयातून पेपर देऊन परतत असणार्या एका 19 वर्षीय तरुणीशी सदर युवकाने दारूच्या नशेत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
प्राध्यापकांची समयसूचकता
त्या तरुणीने विरोध करताच ’मी सोबत आणलेले केरोसीन स्वतःच्या अंगावर ओतून स्वतःला संपवुन घेईल’ अशी धमकी देत सोबत आणलेले केरोसीन अंगावर टाकण्याच्या प्रयत्न केला. सदर प्रकार महाविद्यालयाचे प्राध्यापकांना कळला व त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत असलेला युवक कुणाचेही ऐकण्यास तयार नसल्याने तात्काळ दूरध्वनी करून तळोदा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित युवकास ताब्यात घेतले. घटनेनंतर सदर युवक व विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात धाव घेतली. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात सतत शाळकरी व महाविद्यालयीन तरुणींचा मागे शाळा भरतांना व सूटतांना टवाळखोर व मुलांचा त्रास होत असतो. मात्र घरी सांगितले तर शिक्षण थांबेल या भीतीपोटी तक्रार केली जात नाही. तसेच शाळेचा व महाविद्यालयाचा बाहेरच्या परिसरात रस्त्यावर असे प्रकार होत असल्याने शिक्षक देखील हतबल दिसतात. मागील काळापासून हि अरेरावी वाढली आहे. या समस्येबाबत दामिनी पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.