मराठा समाज हा कधी एकत्र येऊ शकत नसल्याचा आजवरचा समज होता. किंबहुना मराठ्यांना दुहीचा शाप असल्याचे आजवर मानले जात होते. वास्तविक पाहता कमी-अधीक प्रमाणात प्रत्येक समाजात मतभेद असतातच. मात्र मराठा समाजासारख्या मोठ्या समुदायातील भेद हे अधिक ठळकपणे समोर येत असल्याने याची तीव्रता अधिक जाणवत असते इतकाच फरक आहे. आणि हा भेद जाणवण्याचे दुसरे व सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यातील भीषण विषमता होय. आपल्या देशात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन वर्ग आहेत. याला आता ‘इंडिया’ आणि ‘भारत’ असेदेखील संबोधले जाते. याच पध्दतीने मराठा समाजात समृध्द आणि सर्वसामान्य अशा दोन वर्गांमधील अंतर खूप मोठे आहे. या दोन घटकांमध्ये खूप मोठी दरी आहे. यामुळे मंत्री, आमदार, खासदार, कारखानदार, सरकारी अधिकारी/कर्मचारी, सहकार/शिक्षण सम्राट आणि सधन शेतकरी असा समाजात एक वर्ग असला तरी दुसर्याची अवस्था अत्यंत भीषण अशीच आहे.
अल्प-भूधारक, कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजूरीवर अवलंबून असणारा खूप मोठा घटक मराठा समाजात आहे. यामुळे सधन वर्गावरून संपूर्ण समाजच समृध्द असल्याचा समज हा साफ चुकीचा आहे. यात अलीकडच्या काळात शेतीचा व्यवसाय हा अत्यंत बेभरवशाचा झाला आहे. आपल्याकडील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने त्यातील उत्पन्न हे अनिश्चित आहे. यामुळे नापिकी, शेतीचा वाढत जाणारा खर्च, यातून कर्जबाजारीपणा या सर्व बाबी मराठा समाजातील गरीब शेतकर्यांच्या मानगुटीवर बसल्या आहेत. यातून शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत, तर दुसरीकडे शिक्षणाची कास धरावयाची असल्यास येथेही अडचणी आहेतच. आजवर आरक्षणाअभावी मराठा समाजातील गरीब तरूणांना शिक्षणात अनंत अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.
यामुळे मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे ही मागणी कधीपासून करण्यात येत आहे. तथापि, या आरक्षणाला असणारा राजकीय आयाम वादाच्या भोवर्यात सापडला होता. यातच कोपर्डी येथील घटनेमुळे समाजमन ढवळून निघाल्याने मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यावाचून कोणताही पर्याय उरला नाही. मात्र, हे करत असतांना त्यांनी पारंपरीक आंदोलनापेक्षा वेगळा पर्याय निवडला. अर्थात हेच या विराट साखळी आंदोलनांचे वैशिष्ट्य ठरले.वास्तविक पाहता जमाव जितका मोठा तितकाच तो नियंत्रीत करण्यास कठीण असल्याचे आजवर अनेकदा अधोरेखित झाले आहेत. अलीकडच्या काळात अनेक समुदाय रस्त्यावर उतरल्यानंतर हिंस्त्र झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी आरक्षणाचाच विचार केला असता, जाट, पटेल, गुर्जर आदी समाजाच्या आंदोलनास लागलेले हिंसक वळणदेखील अवघ्या देशाने पाहिले आहे. यातून मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत असते.यातच आंदोलक विशेष करून सरकारी मालकीच्या घटकांना टार्गेट करत असतात. या पार्श्वभूमीवर कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ एखादा मोठा समुदाय अगदी शांत व शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर उतरतो काय…अन् अभिनव पध्दतीने आपला रोष प्रकट करतो काय! सारेच काही अभूतपुर्व असे आपण गेल्या काही महिन्यांमध्ये अनुभवले. औरंगाबादपासून सुरू झालेल्या या मोर्च्यांची सांगता मुंबईतल्या महामोर्चाच्या माध्यमातून झाली. दरम्यानच्या कालखंडात अनेक घटना घडल्या. मराठा मोर्चा हा निर्नायक स्थितीत सुरू झाला अन् याची सांगतादेखील याच प्रकारे झाले. कोणतेही नेतृत्व नसताना लाखो लोकांनी व्यक्त केलेल्या निषेधाचा हा पॅटर्न भारताच्याच नव्ह,े तर जगाच्या इतिहासात नक्कीच नोंदला जाणार आहे. या कालखंडात काही राजकीय नेत्यांनी मोर्च्याचे नेतृत्व करण्याचा केलेले प्रयत्न समाजबांधवांनी हाणून पाडले. याचाच अर्थ असा की, मराठा समाजाचा आत कुण्याही राजकारण्यावर भरवसा राहिला नसून आपली लढाई आपण स्वत:च लढण्याचा निर्धार या मोर्चांच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे. यामुळे विषमता वाढीस लावणार्या व्यवस्थेसह समाजाच्या नावावर मोठे झालेल्यांबद्दलही रोष समाजबांधवांच्या मनात असल्याचे यातून स्पष्टपणे दिसून आले आहे.
मुंबई येथे विराट क्रांती मोर्चा सुरू असताना विधिमंडळात राजकीय डावपेच रंगले होते. सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी वर्गवारीप्रमाणे सवलती देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हे खरं तर एक सकारात्मक पाऊल आहे. ओबीसीचा पूर्ण दर्जा मिळण्याआधी या माध्यमातून समाजाची एक महत्वाची मागणी मान्य झाली आहे. तथापि, ओबीसींच्या सर्व सवलती मिळण्यात अडचणींचा मोठा डोंगर पार करण्याचे आव्हान अद्याप बाकी आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे यावर समाधान झालेले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी पूर्णपणे होणार का? हा प्रश्नदेखील उरतोच. याशिवाय कोपर्डीच्या खटल्याच्या निकालासारखे संवेदनशील मुद्दे अद्याप बाकी असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे पूर्णपणे मूल्यमापन अल्प कालखंडाच्या आधारावर करता येणार नाही. याचे नेमके काय परिणाम झालेत? हे काही काळानंतरच समजणार आहेत. मात्र, राज्यातील या सर्वात मोठ्या समुदायाने निषेधाचा शांततामय मार्ग पत्करून एक नवीन आदर्श घालून दिल्याचे सर्वात महत्त्वाचे फलित या आंदोलनातून समोर आले आहे. एकतेची ही वज्रमूठ ऐतिहासिक असून, यातून मराठा समाजाच्या प्रगतीला हातभार लागो हीच सदिच्छा.