एकनाथराव खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश – जयंत पाटील यांनी केली घोषणा

0

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली.

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली. भाजपाची खर्‍या अर्थाने वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचे मला सांगितले. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले. खडसे यांच्याबरोबर बर्‍याचजणांची यायची इच्छा आहे. पण कोरोनाकाळात विधानसभेच्या निवडणुका घेणं परवडणार नाही. पण खडसे यांच्या संपर्कात बरेच आमदार असल्याचे व यथावकाश अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे सांगत जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केला.