एकनाथराव खडसेंचा सरकारवर घणाघात!

1

– शासन हलगर्जीपणा करतेय; कृषिपंप, पोषण आहार घोटाळा, हाफकिन, पाणीपुरवठ्याच्या विषयावरून सरकारला झापले
– खडसेंच्या मागण्या तात्काळ पूर्ण, बाकीच्या सदस्यांचे काय?- अजित पवार

नागपूर : दुसर्‍या आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकीकडे सरकार गुजरात विजयाचे सेलिब्रेशन करत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल करीत मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष असून शासन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप खडसे यांनी सभागृहात केला. जळगाव जिल्ह्यातील हाफकिन, मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजना, शालेय पोषण आहार घोटाळा आणि कृषिपंप मिळण्यासाठी होत असलेल्या विलंबावरून खडसे यांनी संबंधित मंत्र्यांना तोंडघशी पाडले. खडसे यांच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मंत्र्यांनी आश्‍वासन दिले असले तरी त्यांची खदखद सरकारला आगामी काळात महागात पडणार आहे. विशेष म्हणजे यावेळी विरोधी पक्षाकडून त्यांच्या या भूमिकेचे बाक वाजवून स्वागत केले.

– हाफकिनमध्ये शासनाचा हलगर्जीपणा
प्रश्‍नोत्तराच्या तासाला जळगावातील हाफकिनचे युनिट बंद पडत चालले असल्याचे सांगत खडसे यांनी हाफकिन जागा विकण्याचा निर्णय घेणार आहात का? असा प्रश्‍न उपस्थित केला. ते म्हणाले की, हाफकिन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे युनिट आहे. हापकीनचे उत्पादन वाढले पाहिजे, संशोधन चालू पाहिजे यासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र पैसे नसल्याने चांगले शास्त्रज्ञ नाहीत या शास्त्रज्ञाना फार कमी मानधन दिले जात असल्याचे खडसे यांनी सांगितले. अनुभवी संशोधकांचे हाल होत असून हा शासनाचा हलगर्जीपणा आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी लावला. उत्पादन कमी असल्याने जळगावचे बंद होतेय का? असा सवाल करत यासाठी विशेष आराखडा तयार करावा अशी मागणी केली. यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी चांगलीच तारांबळ उडाली. मात्र हाफकीनचे कुठलेही युनिट विकणार नाही तसेच फार्मा कंपनी म्हणून चालविली जाईल असे बापट म्हणाले. तसेच रिसर्चसाठी वेगळे बजेट टाकले असून शासन आता रिसर्चवर भर देत या संस्थेला 1 नंबरवर आणू असेही ते म्हणाले. यासाठी मी अनेकदा नाथाभाऊंना भेटत असून त्यांच्या सूचना ऐकतोय असे सांगत बापट यांनी पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. खडसे यांनी शासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे युनिट बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत संशोधकांना आकर्षक पगार देण्याची मागणी केली. त्यानंतर सजेशन फॉर अ‍ॅक्शन असे उत्तर देत बापट यांनी विषय संपविला.

15 दिवसात कृषिपंपाचे कनेक्शन
– ऊर्जा विभागाच्या संबंधित लक्षवेधी दरम्यान खडसे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनादेखील चांगलेच धारेवर धरले. खडसे म्हणाले की, राज्यभरात कृषिपंपाची स्थिती वाईट आहे. जळगाव जिल्ह्यात 11 हजार कानेक्शन पेंडिग आहेत. शेतकर्‍यांनी डिमांड नोट भरली असूनदेखील 17 हजार कनेक्शन खान्देशात बाकी आहेत. शेतकर्‍यांना जर 5-5 वर्ष कनेक्शन भेटत नसल्याने आकडे टाकत आहेत. मग तुम्ही त्यांना चोर म्हणता. मंत्री योजना जाहीर करतो म्हणतात मात्र निश्‍चित कालमर्यादा सांगा असे म्हणता खडसे यांनी ऊर्जामंत्र्यांना धारेवर धरले. विदर्भात कृषिपंप कनेक्शनमध्ये झिरो पेंडन्सी आहे मग दुसरीकडे आमच्याकडे 5 वर्षांपासून कनेक्शन नाही असे म्हणत त्यांनी ऊर्जामंत्र्याना टोलाही हाणला. यावर बावनकुळे यांनी राज्यात 4 लाख 57 हजार कनेक्शन दिले आहेत यापैकी 2 लाख 18 हजार पेंडिग आहेत अशी माहिती दिली. 15 दिवसात कनेक्शन देऊ तसेच यासाठी कॅबिनेट समोर ’प्रत्येक शेतकरी एक ट्रांसफॉर्मर’ योजना आणणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे यांनीही 2 तास शेतकर्‍यांना वीज वाढवून देण्याची मागणी केली.

– मुक्ताईनगर पाणी योजनेचे आठवडाभरात कार्यआदेश
नागपूर – मुक्ताईनगर-बोदवडमधील 81 गावाच्या पिण्याचा गंभीर प्रश्‍न आमदार एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेत ठेवला. 6 महिने प्रोसेस पूर्ण होऊन देखील काम सुरु होत नसल्याबाबत पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांना धारेवर धरत मुख्यमंत्र्यांनी बोलूनही काम होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. या गावांसाठी 150 टँकर लावावे लागले तसेच आणखी 250 ची मागणी केली गेली. यामुळे या कामाला उशीर करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार का? अशा प्रश्‍न त्यांनी लोणीकर यांना केला. यावर निविदा झाल्या असून मान्यता दिलेली असल्याचे सांगत 8 दिवसात कार्यआदेश देणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. 31 गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा 15 दिवसात निर्णय करू असेही लोणीकर म्हणाले. तसेच राज्यातील 23 योजनांचा विषय 15 दिवसात मार्गी लावू असेही ते म्हणाले. यावेळी खडसे यांनी बोदवडमध्ये नगरपंचायत झाल्याने प्रतिव्यक्ती 60 लिटर पाणी देन्याची मागणीही केली. सविस्तर पान 2

चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही:- अजित पवार
– राज्यातील भाजप आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांची अडचण होत असल्याने त्यांच्याकडून प्रश्‍न उपस्थित केला जात नाही परंतु याचा अर्थ असा नव्हे की सारे काही आलबेल सुरु आहे, असे काहीही घडत नसून कोणी कितीही नाही म्हटले तरी पाणीपुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडरच मंजूर होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. खडसे यांनी काम चार-पाच महिने झाले तरी त्याला सुरुवात करण्यात आले नसल्याचा उल्लेख केला. यानंतर लगेच 8 दिवसात काम सुरु करण्याचे मंत्र्यांनी सांगितले. यावर पवार यांनी खडसे यांनी मुद्दा उपस्थित केला म्हणून त्यांचे काम झाले असल्याचे सांगत सरकारच्या कामकाज पध्दतीवर हल्ला चढविला. यावर लोणीकर यांनी दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.